

महाबळेश्वर : राज्याचे प्रमुख पर्यटनस्थळ, पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणार्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव शनिवारी ओव्हरफ्लो झाला. पहाटे सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणीकरांची तहान भागणार असून दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळणार्या पावसाने महाबळेश्वर अन् पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय येत आहे. 1 जून ते 21 जूनअखेर 939.8 मिमी (37 इंच ) पावसाची नोंद झाली. त्यातच मे महिन्यापासूनच पावसाने धुवाँधार बॅटिंग केल्याने महाबळेश्वरची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या वेण्णा तलावाच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली होती. जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून तर पावसाने चांगलाच जोर धरला होता. या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. त्यामुळे शनिवारी पहाटे महाबळेश्वर -पाचगणीकरांची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. महाबळेश्वरात पावसाने पन्नास इंचाचा टप्पा गाठला की वेण्णा तलाव ओसंडून वाहतो असे समजले जाते. मात्र यंदा मे महिन्यापासून झालेल्या वळीव पावसाने पाणी पातळी वाढली. त्यामुळे यंदा जून महिन्यातच वेण्णा तलाव दुथडी भरून वाहू लागला.
सध्या महाबळेश्वर पर्यटन स्थळी वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल असून वेण्णालेक परिसरात पर्यटकांना अशा धुंद वातावरणाची अनुभूती येत आहे. अनेक जण दाट धुक्यात सेल्फी घेताना पहावयास मिळाले तर अनेक हौशी पर्यटकांनी घुडसवारीचा आनंद घेतला. थंड वातावरणात मका कणीस फँकी व आलेदार चहा घेताना पर्यटक सुखावून जात आहेत. दाट धुकयातील वेण्णालेक पाहून मनाला वेगळाच फिल येत आहे.