

पिंपोडे बुद्रुक : श्रावणी अमावस्येला फलटणच्या बिरोबा देवाला कृष्णेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यासाठी वडूथ (ता. सातारा) येथील कृष्णा नदीचे पाणी घेऊन फलटण तालुक्यातील सरडे, राजाळे व भाडळे खुर्द या गावातील सुमारे 18 ते 20 भाविक चालत परतीच्या प्रवासाला लागले होते. यादरम्यान अज्ञात वाहनाने तीन भाविकांना चिरडले. त्यामध्ये एका भाविकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. अंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव येथे हा अपघात झाला असून, वाहन पसार झाले आहे.
विक्रम तानाजी पिसाळ (वय 22, रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अभिजित पोपट करे (रा. साठेफाटा, ता. फलटण) व सत्यजित पोपट पिसाळ (रा.भाडळी खुर्द, ता. फलटण) हे जखमी आहेत. रात्री 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. यात विक्रमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर अभिजित करे व सत्यजित पिसाळ हेही उडून बाजूला पडले. विक्रमला गंभीर जखम झाल्याने त्याला सातार्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिजित करे यांनी वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.