

सातारा : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. पालेभाज्या जागेवरच सडल्या तर जोरदार पावसाच्या सरींमुळे फळभाज्या, वेलवर्गीय भाज्यांची फुले गळाल्याने त्यांचे उत्पादन घटले आहे. परिणामी मंडई कडाडली असून पावटा वाटाण्याच्या दराची दीडशतकाकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कोथिंबिरीची पेंडी 30 ते 40 रुपयांवर गेली आहे.
जिल्ह्यासह राज्यात मेअखेरपर्यंत मान्सून पूर्व पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे यावर्षी ऐन उन्हाळ्यात पावसाने हाहाकार उडवला होता. या पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले असून तरकारी पिके व पालेभाज्या अतिपाण्यामुळे सडून गेल्या आहेत. परिणामी आवक घटली आहे. टोमॅटो, वांगी, भेंडी, कारले, दोडका, दुधी, ढबू मिरची, फ्लॉवर, कोबी आदि भाज्यांच्या दराने शंभरी गाठली आहे. पाव किलो भाजीसाठी 30 ते 40 रुपये दर आकराला जात असल्याने चौकोनी कुटुंबात दोन वेळच्या जेवणासाठी दिवसाला साठ ते सत्तर रुपये खर्च येत आहे.
आवक घटल्याने कोथिंबीर व पालेभाज्यांचे दरही जुडीला 30 व 40 रुपये मोजावे लागत आहेत. अति पाण्यामुळे पालेभाज्यांची वाढ खुंटली असून पानांवर कीडधाड पडत असल्याने खाण्यायोग्य राहिल्या नाहीत. त्यामुळे दररोजच्या जेवणातून पालेभाज्या गायबच होवू लागल्या आहेत. दररोजच्या जेवणासाठी महागाईची झळ बसू लागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान भाज्या महागल्याने अंडी, चिकन , सुकी मासळी आदींवर ताव मारला जात आहे. अंड्याचे दरही गेल्या आठ दिवसांपासून वाढले आहेत.
मंडई महागल्याने जेवणामध्ये कडधान्यावर भर दिला जात असून डाळीची आमटी व उसळींना प्राधान्य दिले जात आहे. मोडाची आमटी, वालाचं भिरडं, मिश्र डाळींचे घुटं अशा पाककृती पुढे येवू लागल्या आहेत. समतोल आहारात हिरव्या पालेभाज्यांबरोबरच कडधान्य, डाळींचा समावेश करणे आवश्यक असले तरी अनेजण कडधान्य खाताना नाक मुरडतात. अशांमध्येही आता कडधान्याची गोडी वाढली आहे.
भेंडी, गवार, वांगी 80 रु. किलो
शेवगा 20 रु.पेंडी
पावटा, वाटाणा 150 रु.किलो
फ्लॉवर, कारले 100 रु. किलो
कोबी, टोमॅटो 30 रु.किलो
कोथिंबीर, मेथी 30 रु. पेंडी