

सातारा : हिंदू संस्कृती व परंपरांनुसार अखंड सौभाग्यासाठी वडाची पूजा केली जाते. यावर्षी दि. 10 जून रोजी वटपौर्णिमा साजरी होत असून वटपूजेची परंपरा कायम राखली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत पूजा साहित्याची रेलचेल वाढली असून सोमवारी उशीरापर्यंत खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली होती.
महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार्या सण समारंभांतून संस्कृतीचे जतन केले जात आहे. याचाच भाग असलेली वटपौर्णिमा सोमवार दि. 10 जून रोजी साजरी होत असून नववधूंसह सर्वच वयोगटातील महिलावर्गातून त्याची जय्यत तयारी केली जात आहे. बाजारपेठेतही साज शृंगाराच्या वस्तू, मेहंदी, बांगड्या तसेच पूजा साहित्याची रेलचेल वाढली आहे. वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला साहित्यखरेदीसाठी विशेषत: महिलांची झुंबड उडाली होती.
फुले, हार, गजरे, खण-नारळ, फळे, वाणवस्याच्या साहित्याची मोठ्याप्रमाणावर खरेदी विक्री झाली. अनेकींनी वटपौर्णिमेसाठी खास नवीन साडीसह साजशृंगार साहित्याचीही खरेदी केली. बाहेर जावून वडाला फेर्या मारणे शक्य नसणार्यांना पूजेसाठी वडाच्या फांद्या देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या. फळबाजारातही आंब्यासह विविधफळांची आवक वाढली असून मागणीही वाढली होती.
वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आंबा फळाला विशेष महत्व आहे. ओटी व वाणामध्येही आंब्याचा वापर होत असल्याने सोमवारी आंब्यांना मागणी वाढली होती. त्यामुळे आंब्याचे दरही चांगलेच भडकले होते. एरवी 150 ते 200 रुपये डझन मिळणारे आंबे 300 ते 400 रुपये डझन दराने विकण्यात आले. सातारा शहरात सध्या हापूस, पायरीनंतर देशी वाणाचे आंबे तसेच केशर आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाला असून मंगळवारी साजर्या होणार्या वटपौर्णिमेच्या सणासाठी आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.