

बामणोली : राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला शनिवार, दि. 1 नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी सुरू होत आहे.
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थान मानला जातो. शिवसागर जलाशय ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते. गर्द जंगल, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. वासोटा किल्ल्यावरून दिसणारे उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. किल्ले वासोटा पर्यटन सुरू होत असल्यामुळे या भागातील बामणोली, मुनावळे, शेंबडी, तापोळा येथील बोट क्लब चालकांमध्ये तसेच स्थानिक व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात असलेला वासोटा (व्याघ्रगड) पर्यटनासाठी खुला झाल्याने दुर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वासोटा दुर्ग पर्यटनासोबत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील शिवसागर जलाशयातील बोटिंगचाही अनुभव पर्यटकांना घेता येणार असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार किल्ले वासोटा पर्यटन पर्यटनासाठी दि. 1 नोव्हेंबरपासून सुरू करत असल्याची माहिती कोयना वन्यजीव विभागाचे उपसंचालक किरण जगताप यांनी माध्यमांना दिली.