

म्हसवड : वरकुटे (ता. माण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणेश विलास माने (वय 26) यांनी गावी सुट्टीवर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. नुकतेच त्यांचे लग्न ठरले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
जवान गणेश माने हे तीन वर्षांपूर्वी सैन्य दलात भरती झाले होते. ते कोलकाता येथे ड्युटीवर होते. गावी सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व गावातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभागी होणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. गणेश यांच्या अंत्यविधीसाठी कोलकताहून त्यांचे काही सहकारी तसेच वरकुटे पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.