

वडूज : खटाव तालुक्यातील वडूज येथे विजेची तार अंगावर पडून व्यावसायिक शेतकरी युवराज हिंदुराव गोडसे ऊर्फ पिंटूशेठ (वय ५०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
युवराज गोडसे हे गावातील एका व्यक्तीला मोटारसायकलवरून सोडून घरी परतत असताना पंचरत्न मंगल कार्यालय ते मळवी रस्त्यावरील पुलाजवळ पावसामुळे विजेच्या खांबावरील तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. हा प्रकार लक्षात येताच मनोज हणमंत गोडसे, नितीन अरविंद गोडसे, सुनील हिंदूराव गोडसे, चैतन्य युवराज गोडसे व ऋषिकेश सुनील गोडसे यांनी काठीच्या साहाय्याने वीजतार बाजूला करून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर तातडीने डॉ. बी. जे. काटकर यांच्या रुग्णालयात दाखल केले.
मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वडूज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युवराज गोडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष हिंदुराव गोडसे यांचे सुपुत्र, तर नगरसेवक सुनील गोडसे यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वडूज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.