Urmodi Dam: उरमोडीचे चारही वक्र दरवाजे उघडले

विसर्ग ३४५० क्युसेकवर : धरणात ९१ टक्के पाणीसाठा
Urmodi Dam: उरमोडीचे चारही वक्र दरवाजे उघडले
Published on
Updated on

परळी : उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी उरमोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून होणाऱ्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सद्यस्थितीत उरमोडी धरणात ९.०८ टीएमसी (९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग सातत्याने वाढत असल्याने चारही वक्र दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १,५०० क्युसेकची वाढ करण्यात आली असून, चारही वक्र दरवाजांतून आता एकूण ३,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय जलविद्युत प्रकल्पातून ४५० क्युसेक विसर्ग सुरू असल्याने उरमोडी नदीपात्रातील एकूण विसर्ग ३,४५० क्युसेक इतका झाला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गामध्ये वेळोवेळी बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे उरमोडी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायती, ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news