

सातारा : उरमोडी धरण (मोठा प्रकल्प) प्रकल्पाच्या कामांसाठी 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित तांत्रिक समितीच्या प्रस्तावास केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मुल्यांकन संघटन यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती येवून डिसेंबर 2027 पर्यंत तो पूर्ण होईल. त्यामुळे दुष्काळी माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील सुमारे 27750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येवून शेतकरी सुखावणार असल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना, महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे पाणी अडवून ते सिंचनासाठी वापरण्याचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचवेळी पश्चिम भागातील उरमोडी नदीवर उरमोडी धरणाचे पाणी कण्हेर जोड कालव्याव्दारे व पुढे उरमोडी उपसा योजनेंतर्गंत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्यात 450 फुट उचलून, खटाव व माण तालुक्यातील दुष्काळी भागास सिंचन सुविधा पुरविण्याचे नियोजन आहे. त्याकरता 1417.19 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. तसेच 2018 साली उरमोडी प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या बीजेएसवाय या योजनेमध्ये करण्यात आला.
याबाबतीत उरमोडी मोठया प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी ना. सी. आर.पाटील यांची भेट घेवून मागणी केली होती. या पार्श्वभुमीवर नुकतीच केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मुल्यांकन संघटनची बैठक जलशक्ती मंत्रालयात पार पडली. या बैठकीत सन 2023-24 च्या किंमत पातळीनुसार 3042.67 कोटी रुपयांच्या सुधारित किंमत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यत पूर्णत्वास जाणार आहे. त्याबरोबरीने माण, खटाव आणि सातारा या तालुक्यातील अनुक्रमे 9725 हेक्टर, 9725 हेक्टर आणि 8300 हेक्टर असे एकूण 27750 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याचेही खा. उदयनराजे यांनी नमूद केले आहे.