

कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, धडक दिल्यानंतर वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला असून पोलिसांकडून संबंधित वाहनासह चालकाचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून सध्या सुरू आहे. त्यामळे येथील महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात आली आहे. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील कराड ते सातारा या लेनवर सेवा रस्ता ओलांडताना पादचार्यास अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून निघून गेले आहे. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलीस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरनिय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, कोल्हापूर नाक्यावर झालेल्या अपघातानंतर येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.