Ajinkyatara Fort
‘अजिंक्यतार्‍या’च्या पायथ्याचे थडगे हटवले

Ajinkyatara Fort : ‘अजिंक्यतार्‍या’च्या पायथ्याचे थडगे हटवले

नगरपालिका, पोलिसांची धडाक्यात कारवाई : मध्यरात्री स्ट्राईक
Published on

सातारा : किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने गुरुवारी मध्यरात्री हटवले. काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढले असून, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली जाणार असल्याने तो परिसर साफ करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये किल्ले, गड तसेच अतिक्रमण केलेल्या जागांवरील बांधकामावर हातोडा टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण व अतिक्रमण केलेली जागा अडीच वर्षांपूर्वी पोलिस बंदोबस्तात पहाटेच भुईसपाट करण्यात आली होती. त्यानंतरही गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर होती.

सातार्‍यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला व मंगळाई देवीकडे जाताना उजव्या बाजूला लागणार्‍या परिसरात बर्‍याच वर्षांपासून असलेले थडगे होते. राज्यातील गडकिल्ल्यांवर असलेली अतिक्रमणे दि. 31 मेपर्यंत हटवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित अनधिकृत थडग्याबाबत पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र याबाबत नगरपालिकेशी कुणी व्यक्ती किंवा संस्थेने पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने ही धडक कारवाई केली. रात्री सुमारे 60 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मिळण्याचे निश्चित झाल्यानंतर सातारा पालिकेने अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जेसीबी व लागणारे सर्व साहित्य घेतले. रात्री 11 वाजता या जागेच्या परिसरात पोलिसांनी पूर्ण वेढा दिला. पोलिसांचा बंदोबस्तानंतर पालिकेने थडगे काढण्याची मोहिम राबवली. सुमारे एक तास ही मोहिम सुरु होती. यामध्ये पूर्ण जागा भुईसपाट करण्यात आली. या कारवाईत थडग्याखाली कोणत्याही प्रकारचे अवशेष सापडलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news