Umbraj Burglary Case : उंब्रजमध्ये 25 लाखांचा ऐवज लंपास

भरदिवसा सोने, चांदी आणि रोकड असलेली बॅग चोरली; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Umbraj Burglary Case
Umbraj Burglary Case
Published on
Updated on

उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथील चोरे रोड मार्गावर ‌‘श्री वागदेवी ज्वेलर्स‌’चे मालक गणेश यादव-चोरेकर यांनी आपल्या मोटारसायकलवर ठेवलेली सोने, चांदी व रोख रकमेने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या धाडसी चोरीच्या घटनेने उंब्रजसह परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या बॅगेत सात तोळे सोने, पाच किलो चांदी आणि दोन लाखांची रोख रक्कम असा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

या घटनेमुळे परिसरात तसेच व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंब्रज पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच तपास पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. तर घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र तपासाच्या अनुषंगाने कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.

याबाबत घटनास्थळावरून तसेच उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चोरे रोड मार्गावर गणेश यादव यांचे ‌’श्री वागदेवी ज्वेलर्स‌’ नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी सकाळी दहा वाजता दुकानात आले असता, दुकानाच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर आपली मोटरसायकल लावून ते दुकानचे कुलूप काढण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी सोने, चांदी आणि रोख रक्कम असणारी बॅग मोटरसायकलवर ठेवून, दुकान मालक गणेश यादव हे कुलूप काढण्यात मग्न होते. हीच संधी साधून चोरट्याने मोटरसायकलवरील सोने, चांदीने भरलेली बॅग उचलली व भरधाव वेगाने मोटरसायकलवरून पोबारा केला. यावेळी नजीक असणाऱ्या एका महिलेने आरडाओरड केल्याने दुकान मालक आणि नजीकच्या नागरिकांच्या लक्षात सदरची घटना आली. दुकान मालक गणेश यादव यांनी चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे आढळून आले नाहीत.

घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक ठाणेकर आणि पोलिस पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरटे काही अंतरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सदर घटनेत बॅग घेऊन जाणारा आणि मोटारसायकलस्वार असे दोघे जण सामील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपासाच्या अनुषंगाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयिताचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी पोलिस पथकांच्या माध्यमातून संभाव्य मार्गांवर संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news