

उंब्रज : मुंबई मधील एका पाच महिन्याच्या बाळाचे हार्टचे ऑपेरेशन करायला सांगितले होते. त्या बाळाच्या वडिलांची परिस्तिथी बेताचीच असल्याने त्यानी बाळाचे ऑपेरेशन हे सरकारी दवाखान्यात करायचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये बाळाला अॅडमिट केले होते. हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून बाळाला तीन बॅग रक्त लागेल असे सांगण्यात आले. त्यावेळी बाळाच्या वडिलांनी मुंबई मधील रक्तदान क्षेत्रातील सहकारी मित्रांशी संपर्क साधून लहान बाळासाठी रक्ताची मदत करावी अशी विनंती केली.
यावेळी मुंबई मधील सहकार्यांनी उंब्रज येथील मदत रक्ताची संघटनेचे अध्यक्ष परेशकुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधून नेमकी परिस्थिती लक्षात आणून दिली. परेशकुमार कांबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता दिल्ली येथील रक्तदान क्षेत्रातील त्यांचे मित्र व दिल्ली पोलीसमध्ये कार्यरत असलेले रवींदर धारीवाल यांच्याशी संपर्क साधला असता, धारीवाल यांनी दिल्ली पोलीस सहकारी सोनू भांकर यांना एम्स हॉस्पिटलमध्ये रक्तदान करण्यास पाठवले. आणि हॉस्पिटल मध्ये फोन करून तेथील अजून एक रक्ताची बॅग त्या बाळाला उपलब्ध करून दिली. तसेच त्या बाळासोबत असलेल्या वडिलांनी सुद्धा रक्तदान केले.
उंब्रज सारख्या एका छोट्या गावात राहून परेशकुमार कांबळे हे दिल्ली येथील एका पाच महिन्याच्या बाळाला जीवनदान देण्यात यशस्वी झाले असून, परेशकुमार कांबळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.