

सातारा : ‘सेवेचे ठायी तत्पर प्रोडक्शन्स’ या समाजप्रबोधनपर फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स व चित्रफित बनवणार्या कंपनीच्या ‘उजेड’ या शॉर्ट फिल्मची दिल्ली येथील दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. या कंपनीच्या सलग दुसर्या शॉर्ट फिल्मची दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे.
‘उजेड’ ही शॉर्ट फिल्म सत्यजीत उल्हास भोसले यांच्याद्वारे दिग्दर्शित केली गेली असून या फिल्मला या आधी देखील 3 अवॉर्डने सन्मानित केले गेले. विशेष म्हणजे याच कंपनीच्या सत्यजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्लिज चेंग द सोंग’ या शॉर्ट फिल्मचा 2020 मध्ये झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश झाला होता. तसेच विशेष परीक्षक निवड म्हणून पारितोषिक सुद्धा या फिल्मने पटकावले होते. परंतु त्या वर्षी कोव्हीडमुळे हा फेस्टिव्हल न झाल्यामुळे सर्व विजेत्यांना अवॉर्ड घरपोच मिळाले होते. त्यामुळे विजेती ठरून देखील एका मोठ्या मंचाला ही फिल्म व निर्माते मुकले होते. दरम्यान, सत्यजित व त्यांच्या टीमने जिद्दीने 2024 मध्ये ‘उजेड’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित शॉर्ट फिल्म बनवून यंदाच्या फेस्टिव्हलला पाठवली होती. हजारो प्रवेशिकांमधून या फेस्टिव्हलसाठी ‘उजेड’ची निवड झाली आहे. 1 मे रोजी नवी दिल्ली येथे होणार्या पारितोषिक वितरण समारंभासाठी सत्यजित यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.