

सातारा : राज्यात येणार्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा पहिला प्रयोग महाबळेश्वर येथील महापर्यटन महोत्सवात केला. महाबळेश्वर तसेच पाचगणीमध्ये या सुरक्षा दलाच्या टीमने चांगले काम केले. त्यामुळे मुंबईसाठीही पर्यटन सुरक्षा दलाच्या टीम तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, एकनाथ शिंदे मालकांना भेटायला दिल्लीत गेले होते या आरोपांना उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे कोणाच्या मालकाला भेटायला दिल्लीत गेले होते? असा पलटवार केला आहे. ना. शंभूराज देसाई म्हणाले, राज्याच्या पर्यटन विभागाने महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या महापर्यटन महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा पहिला प्रयोग करण्यात आला. महाबळेश्वर व पाचगणीसाठी 25 जवान व एक अधिकारी यांचा समावेश असणार्या दोन टीम केल्या. महाबळेश्वर व पाचगणी ठाणे प्रभारी व उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडून या टीमच्या कामकाजाचा आढावा घेतला. तीन महिन्यांत या टीम्सने चांगले काम केले. पर्यटकांची सुरक्षा, वाहतूक सुरळीत करणे, वादविवाद सोडवणे अशी कामे या टीमने केली.
या टीमला प्रशिक्षण देणे, सुचना करणे, कायद्याची माहिती दिली जाणार आहे. या टीमधील जवानांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या पर्यटकांचा विचार करता मुंबई येथे दुसरी टीम तैनात करण्यात येणार आहे. ट्रायडंट हॉटेलपासून मलबार हिलला जाताना असणारी व्हीव्हीयन गॅलरी येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. तसेच हॉटेल ताज, गेट वे ऑफ इंडिया व रेडियो क्लब येथील समुद्र किनार्यावर दुसरी टीम करणार आहे. या टीमसाठी वाहने खरेदी करण्यात येणार असून एमटीडीसीला तशा सुचना करण्यात आल्या आहेत. महाबळेश्वर व पाचगणीसाठी 2 व मुंबईसाठी 2 अशी चारचाकी वाहने व 10 दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.
महाबळेश्वर व पाचगणीसाठी काम करणार्या टीममध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. मुंबईसाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळाकडून मेस्कोचे कर्मचारी घेणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल तीन महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आले. चांगला अनुभव आल्याने दोन महिन्यांत मुंबईत दुसरे दल स्थापन करण्यात येणार असल्याचे ना. शंभूराज देसाई यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे दिल्लीला त्यांच्या मालकाला भेटायला गेले होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे, याबाबत विचारले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे हे कोणाच्या मालकाला भेटायला गेले होते? स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला ‘मोतोश्री’च्या दारातही येऊ दिले नाही, त्या काँग्रेस नेत्यांच्या दारात ते का गेले? ते नेते त्यांचे कोण आहेत, त्याचे उत्तर त्यांनी प्रथम द्यावे, अशी टीका ना. शंभूराज देसाई यांनी केली.
युतीचा निर्णय घ्यायला आम्ही भाऊ खंबीर असून तिसर्याने बोलायची गरज नाही असे उद्धव ठाकरे सांगत असल्यामुळे मविआ आणि इंडिया आघाडीचे काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधले असता ना. शंभूराज देसाई म्हणाले, मविआची शुक्रवारी बैठक आहे. मविआतील घटक पक्षांबद्दलच्या भूमिकेबद्दल दोघांनाही ते पक्ष विचारतील अशी शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हलचे आयोजन करणार
ना. शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरणाच्या मागील जलसाठ्यालगत 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान बॅक वॉटर फेस्टिव्हल भरवण्यात येणार आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवर पावसाळा वगळता कायमस्वरूपी ड्रोन शो करण्यासाठी लागणार्या निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.