

सातारा : सातारा पालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचेच काम करा. अपक्षांनी उमेदवारी माघारी घेऊन पक्षाला मदत करावी. जुन्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. सर्व उमेदवारांनी समन्वय ठेवून काम करावे. एकजुटीने, शिस्तीत आणि संघटितपणे काम केले तर विजय आपलाच आहे, असा निर्धार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी बैठकीत केला.
सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांची बैठक खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी बुधवारी पार पडली. यावेळी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर प्रमुख उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, प्रत्येकाने पॅनेल टू पॅनेल उमेदवाराचे काम करावे. मतांचे विभाजन होणार नाही, याची काळजी घ्या. पूर्वीचे हेवे दावे, रूसवे फुगवे बाजूला करून झोकून देऊन काम करावे. प्रभागात होणाऱ्या प्रचारादरम्यान आजी-माजी नगरसेवकांना सन्मानाची वागणूक द्या. काहीजणांनी अपक्ष म्हणून भरलेले अर्ज काढून घेऊन अधिकृत उमेदवारांचे काम करावे. प्रत्येकाने प्रभागात ठोस योजना आखून काम करावे. सर्व उमेदवारांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक व पारदर्शक काम करावे, असे आवाहनही खा. उदयनराजे यांनी केले.
यावेळी श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन करत निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वतोपरी साथ देण्याचे आश्वासन दिले. सुनील काटकर तसेच ॲड. डी. जी. बनकर यांनी स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळकटीबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. दरम्यान, उमेदवारांनी प्रभागातील प्रश्न, अडचणी आणि जनतेच्या अपेक्षा मांडल्या.