

सातारा : लोकसभा निवडणुकीत एकमेकांपुढे शड्डू टाकून आरोप प्रत्यारोपांनी आखाडा गाजवणार्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांच्यातील मैत्रीचा गोडवा नव्याने दिसून आला. निमित्त होते, जिल्हा नियोजन समिती बैठकीचे. या बैठकीवेळी खा. उदयनराजेंनी आ. शशिकांत शिंदे यांना पुष्पगुच्छ देत ‘तुम्हाला नाही द्यायचा, तर कुणाला द्यायचा’, असे म्हणत आपल्या स्टाईलने त्यांचे स्वागत केले.
सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीसाठी खा. उदयनराजे नियोजन भवनात दाखल झाले. दाखल झाल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर असणार्या पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. शिवेेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, खा. नितीनकाका पाटील यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यानंतर बैठकीला उपस्थित असणारे आ. मनोजदादा घोरपडे, आ. अतुल भोसले, आ. जयंत आसगावकर यांनाही उदयनराजेंनी पुष्पगुच्छ दिले. त्यावेळी समोरच आ. शशिकांत शिंदे होते. हे पाहून खा. उदयनराजेंनी त्यांनाही पुष्पगुच्छ देत ‘तुम्हाला नाही द्यायचा, तर कुणाला द्यायचा’ असे म्हणत मिश्किली केली. उदयनराजेंच्या या स्टाईलला उपस्थितांनीही दाद दिली.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरूध्द शड्डू ठोकला होता. त्यावेळी दोघांनीही एकमेकांवर टिकेची झोड उठवली होती. मात्र, यानंतरही त्यांच्यातील मैत्रीचा गोडवा कमी झालेला दिसून आला नसल्याचे पहायला मिळाले. डीपीसीच्या बैठकीत पुन्हा याचा प्रत्यय झाला. राजकारणात जय-पराजय हे होत असतात परंतु, मैत्री जपली पाहिजे, हा संदेश या नेत्यांनी या कृतीतून दिला.