

सातारा : सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर खासदार उदयनराजे भोसले गटाच्या ‘स्वीकृत’सह सुमारे २८ नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने खळबळ उडाली. उपनगराध्यक्ष बनकर अवमान प्रकरण, बांधकाम सभापती बाळू खंदारेंना निलंबित करणे, मागील सभेतील वादग्रस्त वक्तव्य इतिवृत्तातून न वगळल्याने नाराज खा. उदयनराजे गट व मंत्री शिवेंद्रराजे गटातील सुप्तसंघर्षाचा पुन्हा भडका उडाल्याचे दिसून आले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले गटाच्या नगरसेवकांनी कोरम पूर्ण करत विषयपत्रिकेवरील सर्व ४० विषयांना मंजुरी देत सभेचे कामकाज पार पाडले.
पालिकेची सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच उदयनराजे गट कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याची चर्चा पसरली. गटनेते अविनाश कदम यांनी सावध पवित्रा घेत कामकाज चालवण्यासाठी व आवश्यक गणपूर्तीसाठी (कोरम) नगराध्यक्षांच्या केबिनला बसून नगरसेवकांशी फोनाफोनी सुरू केली. १७ नगरसेवकांचा कोरम पूर्ण होताच कामकाज वेळेत सुरू झाले.
मात्र, बराच वेळ जाऊनही खासदार गट सभागृहात दिसत नसल्याने चर्चांना़ उधाण आले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक गैरहजर कसे काय राहू शकतात, अशी विचारणा होऊ लागली. अशातच विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन सुरू झाले. प्रत्येक विषयावर चर्चा करत सभेचे कामकाज अर्ध्या तासात संपले. यावेळी 'स्वीकृत'सह २८ नगरसेवक हजर राहिले.
सभेनंतर खासदार गटाच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली असता गटनेते कदम म्हणाले, उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर व प्रतोद निशांत पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. सर्वजण सभेसाठी उपस्थित राहणार होते. मात्र, सभेसाठी अॅड. बनकर यांच्याशी संपर्क साधला असता फोन बंद होता. आमच्या ग्रुपवर मेसेज पडल्यामुळे सभेला कसं काय येणार? असा संभ्रम निशांत पाटील यांमध्ये निर्माण झाला. दोन्ही राजेंच्या नेतृत्वाखाली पालिकेचे कामकाज सुरू असून दोघेही योग्य निर्णय घेतील. मनोमिलनाला कुठेही तडा गेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅड. डी. जी. बनकर यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
शिवेंद्रराजेंनी आज बोलावली नगरसेवकांची बैठक
पालिकेतील दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष निर्माण झाला असतानाच शिवेंद्रराजे भोसले यांनी सर्व नगरसेवकांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजता बोलावली आहे. याचा निरोप सायंकाळी नगरसेवकांना दिला आहे. या बैठकीत शिवेंद्रराजे हे नगरसेकांना काय सूचना करतात? सभेला गैरहजर राहणारे खासदार गटाचे नगरसेवक या बैठकीस उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.