

सातारा : जिल्हा बँक असो किंवा अन्य काही, आमच्या घराण्याच्या परंपरेला कधीही तडा जाऊन देणार नाही. चोवीस तास.. तीनशे पासष्ट दिवस केव्हाही हाक मारा, सदैव मदतीसाठी तत्पर आहे. लोकांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद जपले आहेत. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. श्वासात श्वास असेपर्यंत लोकांची सेवा करणार. कुठल्याही अडीअडणीच्या काळात कमी पडणार नाही. पदे येतात जातात, त्याचा मी विचार करत नाही. वडिलधार्यांचे आशीर्वाद ही माझी पुण्याई आहे, असे भावनिक उद्गार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.
खा. उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खा. उदयनराजे भोसले मित्र मंडळाकडून हॉटेल लेक व्ह्यू येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जि. प. सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे, डी. के. पवार, रामभाऊ लाहोटी, संतोष कणसे, बाळासाहेब ननावरे, अशोक मोने, यशवंत ढाणे, शिवराम पाटील, बबनराव यादव, राजेंद्र पाटील, शिवाजीराव जाधव, उदयसिंह जगदाळे, धनाजी साळुंखे, लक्ष्मण गडोख उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, सहकार चळवळीचा कणा असलेल्या सहकारी बँका, पतसंस्था, सुतगिरण्या, साखर कारखाने यातून जास्तीत जास्त शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, सर्वसमान्य लोकांची प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा, त्यांच्या भावी पिढीला त्यातून लाभ मिळावा यासाठी सहकार चळवळ सर्वाधिक महाराष्ट्रात रूजली. अनेक दिग्गजांनी सातारा जिल्हा बँकेचे नेतृत्व केले. त्यांनी सामान्यांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्याने ही चळवळ तळागाळापर्यंत विस्तारली. सहकारात राजकारण आणले तर सर्वसामान्यांची उन्नती करण्याचा हेतू बाजूला पडतो. सहकाराची वाताहत होते. माझ्यापेक्षा सहकाराचे ज्ञान असलेले अनेकजण आहेत.
मात्र जिल्हा बँकेत मी असावे असा त्यांचा आग्रह होता. मी पदाला हपापलो नाही. मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यापेक्षा जिल्हा बँकेचे पद मोठे नाही. जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, एवढाच जिल्हा बँकेत येण्यामागचा हेतू आहे. सर्वांनी पहिल्यापासून मला पाठबळ दिले. मला ताकद देणारे काहीजण आता हयात नाहीत. माझी राजकीय वाटचाल नगरसेवक-आमदार-खासदार अशी राहिली. आयुष्यात चढउतार खूप पाहिले, पण कधी खचलो नाही. आपल्या हातून लोकांची कामे व्हावीत, या एकमेव भावनेतून जिल्हा बँकेत आलो. सर्वांची साथ मिळाली. असंच प्रेम आयुष्यभर राहू द्या, असेही खा. उदयनराजे म्हणाले. यावेळी सुनील काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.