

सातारा : माणसे मारणार्या अतिरेक्यांना कोणतीही जात आणि धर्म नाही. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर तर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत. गुन्हेगारीसाठी अल्पवयीनांचा उपयोग केला जात आहे. कायद्याने अल्पवयीनांना शिक्षा देता येत नसल्याने त्यांच्या हाती बंदुका देऊन दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत.
वास्तविक, अतिरेक्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प उद्ध्वस्त केले पाहिजेत, तसेच वयाचा मुलाहिजा न बाळगता अतिरेक्यांचा खात्मा केला पाहिजे, असे स्पष्ट मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी जलमंदिर पॅलेस येथे दिलेल्या भेटीनंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले पत्रकारांशी बोलत होते.
खा. उदयनराजे म्हणाले, मुळात ज्याला आपण जन्माला घालू शकत नाही, त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अतिरेक्यांना कुठली जात, धर्म नाही. पहलगाम येथे जो प्रकार घडला, तो अत्यंत किळसवाणा आहे. प्राणी परवडले पण माणसे नाही. एवढा किळसवाणा प्रकार केला गेला आहे. या प्रकाराने वेदना होतात, या प्रकाराची गुन्हेगारी थांबवायची असेल तर तिथे मागे पुढे पाहता कामा नये. गुन्हेगार मग तो 16, 17 वर्षांचा का असेना, त्याला सुट्टी द्यायची नाही. याच मुलांचा उपयोग क्राईमसाठी केला जात आहे. त्यांच्याकडून गुन्हा घडल्यानंतर त्याला रिमांडहोममध्ये पाठवले जाते, तिथून त्याची कधी सुटका होते, ते कळतही नाही, त्यांच्या हाती बंदुका असतात. तो कुणाला जर मारू शकत असेल तर अशांचा खात्मा झालाच पाहिजे. अतिरेक्यांचे ट्रेनिंग कॅम्पस उद्ध्वस्त करून टाकले पाहिजेत. अतिरेकी कारवायांचा मुद्दा जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. याबाबत तोडगा काढला गेला पाहिजे. असे किती दिवस चालणार आणि किती लोक मृत्युमुखी पडणार? असा उद्विग्न सवालही खा. उदयनराजेंनी उपस्थित केला.
मंत्री दादा भुसे यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगानेही उदयनराजेंनी माहिती दिली. ते म्हणाले, बालभारती इतिहासाची पुस्तके प्रकाशित करते, दरवर्षी वेगळा इतिहास पुस्तकात मांडला जातोय. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, यासाठी लहानपणापासून मुले, मुली यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे. प्राथमिक शिक्षणात घेतलेले ज्ञान रुजले जाते. त्यामुळे इतिहासाच्या पुस्तकात या दोन्ही राजांचा धडा असलाच पाहिजे. दोघे मोठे योद्धे होते, सगळ्या बाजूने बघितले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज श्रेष्ठ होते.
हिंदी विषयाच्या सक्तीबाबत मत मांडताना उदयनराजे म्हणाले, आपण सर्वांनी वस्तुस्थितीशी गाठ बांधली पाहिजे. जग मोठ्या वेगाने चालले आहे. 21 वे शतक फार वेगाने चालले आहे. पाच, सहा दिवस बातम्याही वाचल्या नाहीत, तर लिंकही लागत नाही. त्यामुळे उंचीवर जायचे असेल तर प्रत्येक भाषेला महत्व दिले पाहिजे. पुढे जायचे असेल तर जगात भाषा आहेत, त्या शिकाव्याच लागतील. भारताने हे स्वीकारले असल्यानेच जगातील देश हे चीनपेक्षाही व्यापारासाठी भारतात प्राधान्य देत आहेत, असे खा. उदयनराजेंनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण विकास समितीचे सदस्य काका धुमाळ, पंकज चव्हाण, अजय मोहिते उपस्थित होते.
शिवरायांनी बांधलेले गडकिल्ले आजही दिमाखात उभे आहेत. त्यावेळच्या इंजिनिअरिंगचा भाग हा शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. राज्यातील क्रीडा क्षेत्र विकसित करायचे असेल तर प्रत्येक शाळेला शासनाने स्पोर्ट किट द्यावे. शिक्षक, कर्मचार्यांच्या रिक्त जागा भराव्यात, महिला, मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नसल्याने स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने कॅम्प आयोजित करावा. ज्या पद्धतीने संभाजीनगर व पुणे येथील शाळांमध्ये असे ट्रेनिंग कॅम्प घेतले जातात, तसेच ते राज्यातील इतर शाळांमध्येही घेण्यात यावेत, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.