

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पोवईनाक्यावर ‘इलाका तेरा... धमाका मेरा’ हा त्यांचा फेमस डायलॉग जोरदार घुमला. उदयनराजेंचे कट्टर समर्थक आणि रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोझर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी केक कापून उदयनराजेंचा वाढदिवस साजरा केला. अवघे वातावरण महाराजमय झाले होते. यानिमित्ताने राजधानी सातार्यात रात्रभर उदयनराजेंचाच जलवा पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशीलदादा मोझर यांचे राजधानी सातार्यात जोरदार कमबॅक दिसले.
रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने पोवईनाका येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली होती. या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरासह राज्यभरातील हजारो राजेप्रेमी सातार्यात दाखल झाले होते. पोवईनाक्यावर येणारे सातही रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
पोवईनाक्यावर भव्य स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजसह परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच दुबईच्या लेझर लाईटच्या फोकसने वातावरणात आणखी उत्साह आणला. यावेळी डॉल्बीचा जोरदार दणदणाट करण्यात आला.
‘इलाका तेरा... धमाका मेरा...’ हा लोकसभा निवडणुकीत गाजलेला उदयनराजेंचा डायलॉग ऐकल्यानंतर तरुणाई आणखीच उत्साही होताना दिसत होती. राजेप्रेमी डॉल्बीच्या तालावर थिरकताना पहायला मिळाले. डॉल्बीच्या तालावर हजारो युवकांनी डान्स केला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. पोवईनाक्यावर जणू दिवाळीच साजरी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्ये दिग्विजय मिळवल्यानंतर ज्या प्रमाणे उदयनराजेंचे राजेप्रेमींनी स्वागत केले होेते, अगदी त्याच पध्दतीने पोवईनाक्यावर आनंदोत्सव साजरा झाला.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोझर आणि माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणारे सुशीलदादा मोझर उदयनराजेंची सावली म्हणून ओळखले जात होते. उदयनराजेंना मानणारा तरुणांचा वर्ग राज्यभर मोठा आहे. हा तरुणवर्ग एकत्रित करण्याचे काम करणार्या सुशीलदादा मोझर यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार ‘कमबॅक’ केले. सुशीलदादा मोझर यांनी दुबईसारखी आतषबाजी सातार्यात करून उदयनराजेंच्या वाढदिवसाचा माहोल तयार केला. या आतषबाजीत सातारा रात्रभर आनंदून गेला.