

सातारा : वाई तालुक्यातील दोन सख्ख्या बहिणींचे तिसऱ्या बहिणीने अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकरणात एका तिऱ्हाईताने न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून खुद्द न्यायाधीशांनी या घटनेला प्रतिसाद दिला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, अपहरणाची ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली आहे. पीडित महिलेपैकी एक बहीण घरकाम करते. घरकाम करणारी ही महिला कामाला न आल्याने व फोनवरही संपर्क होत नसल्याने घरमालकाने अधिक माहिती घेतली. या माहितीमध्ये प्रॉपर्टीसाठी संबंधित महिलेसह तिच्या बहिणीचे अपहरण झाल्याचे त्यांना समजले. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही बहिणींचे त्यांच्याच तिसऱ्या बहिणीने अपहरण केल्याचेही समजले. यामुळे तिऱ्हाईत असलेल्या घरमालकाने पोलिस ठाणे गाठले; मात्र पोलिसांनी काहीही ऐकून घेतले नाही. यामुळे घरमालक व्यक्तीने वकिलामार्फत थेट न्यायालयाचे दार ठोठावले.
न्यायाधीशांनी याबाबत प्रतिसाद देत सर्च वॉरंट काढले. तसेच पोलिसांनाही नोटीस काढली. यावर पोलिसांनी यात्रा बंदोबस्ताचे कारण देत काही दिवसांची मुदत मागितली. त्यानुसार 9 तारीख पडली. अपहरण केलेल्या दोन्ही बहिणींचा शोध सुरू झाल्याचे समोर येताच तिसऱ्या बहिणीने बुधवारी दोन्ही बहिणींना नाट्यमयरीत्या न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीशांनी पीडित बहिणी असलेल्या दोन्ही महिलांची चौकशी केली असता त्यांनी अन्याय झाल्याचे सांगितले.
न्यायाधीशांनी दोघींची बाजू ऐकून त्या दोन्ही महिलांना त्यांच्या घरी जाण्याचे आदेश केले. या सर्व घटनेमुळे तिऱ्हाईत घरमालक व्यक्ती व न्यायाधीशांच्या या कृतीमुळे दोन महिलांची सुटका झाली आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का? मूळ प्रकरण काय आहे? महिलांचे अपहरण कोणी केले? अपहरण केल्यानंतर त्यांना कुठे ठेवण्यात आले? यामागे किती जणांचा सहभाग आहे, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.