

सातारा : जनावरे कत्तल व विक्रीचा कोणताही परवाना नसताना दोघेजण जनावराची कत्तल करताना आढळल्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील तेली खड्डा परिसरात ही घटना घडली. दरम्यान, यावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी पोलिस मुख्यालय व शहर पोलिस ठाण्यासमोर येत आक्षेप घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
झाकीर कासीम शेख (वय 50, रा. शनिवार पेठ, सातारा) व इरफान झाकीर शेख (वय 35, रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 च्या सुमारास समोर आली आहे. तेली खड्डा येथे मांस कापून त्याची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे कापलेले मांस व वजन काटा होता. पोलिसांनी दोन्ही संशयितांना विचारणा केली असता, दोघांनी परवाना नसल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन मांस जप्त केले.
तेली खड्ड्यात जनावराची कत्तल करून विक्री होत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना समजल्यानंतर ते शहर पोलिस ठाण्यासमोर जमा झाले. यावेळी संघटनांच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईची माहिती देऊन सर्व शहानिशा करणार असल्याचे सांगितले. मात्र, पदाधिकारी ऐकत नसल्याने तणातणी होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांनी पशुधन विकास अधिकारी यांना बोलावून संबंधित मांस कशाचे याची माहिती घेतली.