Satara News | हळद पिकासह शेतातील माती गेली वाहून
मसूर : सहा दिवसांपासून सुरू असणार्या मुसळधार पावसामुळे वडोली भिकेश्वर (ता. कराड) येथील हुंबरी नावच्या शिवारातील सुमारे दीड एकरातील शेताची माती हळद पिकासह वाहून जाऊन शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी मुसळधार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने अनेक शेतकर्यांच्या शेताचे बांध फुटून पीक व ठिबकच्या साहित्यासह माती ओढ्यामध्ये वाहून गेली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ‘सर आली धावून शेती गेली वाहून’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
बुधवार व गुरुवारी मसूरसह परिसरात ढगफुटी सद़ृश्य पाऊस झाला. या पावसाने वडोली भिकेश्वर येथील उत्तर बाजूस असणार्या हुंबरी नावच्या शिवार परिसरातील सुभाष नारायण साळुंखे यांची गट नंबर 178 मधील 24 गुंठे शेतातील हळद पीक तसेच ठिबक मातीसह वाहून गेल्याने त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लक्ष्मण भीमराव साळुंखे व विनोद दादासो शेडगे यांच्याही शेतातील माती वाहून गेल्याने या ठिकाणी चर पडून मोठे नुकसान झाले आहे.
तसेच बाबुराव पिलाजी शेडगे यांची गट नंबर 174 मधील शेतीची माती वाहून गेली तर बाळासो यशवंत शेडगे या शेतकर्याची नऊ गुंठे शेतातील माती वाहून जाऊन शेतात दोन फूट चर निर्माण झाली आहे. पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचले तसेच बांध देखील फुटले आहेत. तलाठी विशाल बाबर यांनी नुकसान झालेल्या शेतात भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान कवठे परिसरातही काही शेतकर्यांच्या जमिनी अशाच पद्धतीने वाहून गेल्या आहेत. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

