

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणांगण तापले असून नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या जागांसाठी भाजप, सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाली आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटांमध्ये झालेल्या मनोमीलनानंतर निवडणूक एकत्र लढवली जाणार आहे. मात्र नगराध्यक्षपदासाठी सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे.
साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सर्वमान्य उमेदवार उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साविआकडून काका धुमाळ, संग्राम बर्गे आणि किशोर शिंदे यांची तर नविआकडून अविनाश कदम, अमोल मोहिते आणि जयेंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठरणार असल्याची चर्चा असली तरी बुधवारी दिवसभर साविआतील उमेदवारांची चर्चा होती. बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही राजे गटांमध्ये आपापले पत्ते जपून उघडले जात आहेत. साविआ आणि नविआत पदाधिकारी आपापल्या आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, यासाठी मुंबईपर्यंत संधान साधत आहेत. दरम्यान, जागा वाटपाचे गणित वारंवार बदलत असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे.
नगरसेवकपदाच्या 50 जागांसाठी भाजपकडून 500 हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येतील उमेदवारांमुळे निवडणुकीत तिकीट वाटपाचे राजकारण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. एकीकडे पक्षीय गटबाजी, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर वाद या दोन्ही गोष्टींमुळे मनोमीलन फक्त चर्चेपुरते राहणार काय?, असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
मनोमीलन झाले असले तरी दोन्ही राजे गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरूच आहे. ज्यांनी चार वर्षांपासून प्रभागात पदरमोड करून कामे केली, त्यांना तिकीट मिळणार का? याची शंका निर्माण झाली आहे. काही इच्छुकांनी तर उघडपणे बंडखोरीचा पवित्रा घेत उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू केले आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
साताऱ्यातील प्रमुख प्रभागांमध्ये साविआ आणि नविआ या आघाड्या एकमेकांशीच भिडत आहेत. भाजपकडील वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही गटांना समजवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी प्रत्येकजण नगराध्यक्षपदाचा दावा सोडायला तयार नाही. काही ठिकाणी एकाच प्रभागातून दोन्ही आघाड्यांचे उमेदवार नगरसेवकपदासाठी अर्ज करण्याची शक्यता निर्माण झाल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत संघर्ष स्पष्ट दिसू लागला आहे.
सातारा पालिका निवडणुकीत दोन्ही आघाड्यांचे मनोमीलन झाले असले तरी एकदिलाने निवडणूक लढली जाईल का? याची शक्यता अत्यल्प आहे. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारीची लाट दिसू शकते. त्यामुळे निवडणूक निकालात अनपेक्षित उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून थोडे दिवसच शिल्लक राहिले आहेत. अद्याप महायुती किंवा मविआकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दोन दिवसांत राजकीय हालचाली, दबाव आणि चर्चांचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे. मनोमीलनांतरही जर भाजप व दोन्ही आघाड्यांमध्ये सुंदोपसुंदी सुरू राहिली तर विरोधकांच्या गोटात आनंद आणि सत्ताधाऱ्यांच्या छातीत धडकी अशी परिस्थिती निर्माण होईल. साताऱ्यातील सत्तेचा राजकीय खेळ आता कोणाच्या बाजूने झुकतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.