पिंपोडे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा
सातारा-लोणंद रस्त्यावर अंबवडे सं. वाघोली गावानजीक सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर एका ट्रकने पेट घेतल्याने यातील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. चालक गाडीतच अडकून पडल्याने त्याचा अक्षरश: कोळसा झाला. अल्ताफ मन्सुरी (वय 20, रा. भगोरा, जि. राजगड) असे त्याचे नाव आहे. दुसर्या गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेश दयानंद घुगे (वय 37, रा. गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर) असे त्याचे नावे आहे.
जखमी क्लिनर मांगीलाल रामप्रसाद भोल, रा. स्वायादीप, मध्य प्रदेश) दुसरा क्लिनर उदय आबाजी पाटील (रा. कणेरी मठ, कोल्हापूर) यांच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेची नोंद वाठार पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लोणंद बाजूकडून कडप्पा फरशी भरलेला ट्रक (क्रमांक आर. जे.17. जी.बी.6561) सातारच्या दिशेने जात होता. तर दुसरा मालवाहू ट्रक (क्रमांक एम. एच. 20 एजी. 7775)
सातार्याकडून लोणंदकडे निघाला होता. अंबवडे चौक ते पिंपोडे खुर्द गावांच्या दरम्यान पेट्रोल पंपानजिक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. यामध्ये कडप्पा भरलेल्या ट्रकचा चालक अल्ताफ मन्सूरी हा जखमी अवस्थेत केबिनने अडकला. या ट्रकनेच अचानक पेट घेतला. त्यामुळे जखमी क्लिनर मांगीलाल रामप्रसाद भोल याने जखमी चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आहे. त्यामध्ये मांगीलाल भाजला. मात्र अक्षरशः चालक अल्ताफचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.
दुसर्या मालवाहू ट्रकचा चालक महेश दयानंद घुगे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला वाठार स्टेशन पोलिसांनी उपचारांसाठी शासकीय रुग्णालय सातारा येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पहाटे 4 च्या सुमारास वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रकची आग वाई अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत ट्रकची केबिन खाक झाली होती.
दरम्यान, जळालेल्या ट्रकमधून एक छोटा गॅस सिलिंडर मिळाला आहे. मात्र, तो सुरक्षित आहे. ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती मिळाली नाही. अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक वाठार पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळवल्याने वाहतूक कोंडी टळली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेन आणली होती. एक ट्रक बाजूला करण्यात यश आले. परंतु, दुसरा ट्रकमध्ये 30 ते 35 टन फरशी असल्याने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करता आले नाही. त्यामुळे दुसरा ट्रक आणून त्यामध्ये तो माल भरण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.