

सातारा : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा जिल्हा परिषदेत शनिवारी मोठ्या प्रमाणात राजरोसपणे झाडांची कत्तल करण्यात आली. याबाबत वनविभाग व नगरपालिकेच्या वृक्ष विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद परिसराला बकाल स्वरूप आले आहे. सुट्टीचा माहोल बघून तोडण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे वाढली असल्याने जिल्हा परिषदेला चांगली शोभा येत आहे. मात्र शनिवार सुट्टीचा दिवस बघून लोकल बोर्ड इमारत परिसर, शासकीय अधिकारी निवासस्थान परिसरातील महाकाय झाडांची कत्तल करण्याचे काम सकाळपासूनच हाती घेण्यात आले आहे. याबाबत संबंधित कर्मचार्यांनी झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. अशोक, बदाम, सुरू यासह अन्य झाडांच्या फांद्या धोकादायक होत्या त्या तोडण्यात आल्याचे सांगितले. मात्र, धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या नावाखाली छोट्या-मोठ्या झाडांची राजरोसपणे कत्तल करण्यात आली.
झाडे व झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने वन विभाग व नगरपालिकेच्या वृक्ष विभागमार्फत परवानगी घेतली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे राज्य शासन झाडे लावा झाडे जगवा यावर फोकस करत आहे. मात्र दुसरीकडे शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे झाडांच्या कत्तली दिवसा सुरु आहेत. झाडे तोडण्यात आल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तसेच पर्यावरण प्रेमींमधूनही नाराजी व्यक्त होत आहे.