

कराड : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना व प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून याची जबाबदारी टोल प्रशासन पार पाडताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात दोन टोलनाके असून या टोलनाक्यामार्फत ही मदत पुरविण्यात येत आहे.
प्रवासादरम्यान अपघात होतो. तसेच प्रवासात कोणतीही तातडीची मदत लागू शकते. त्यासाठी संबंधित महामार्गावर असलेल्या टोल प्रशासनामार्फत गरजू प्रवाशांना मोफत मदत पुरविली जात आहे. सातारा जिल्ह्यात शिरवळपासून मालखेडपर्यंत आशियाई महामार्ग आहे. महामार्गावर आनेवाडी आणि तासवडे येथे टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून हजारो वाहने दररोज ये-जा करतात. वाहनधारकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी टोलनाका व्यवस्थापनाकडे आहे. सोयी सुविधांसह आपत्कालीन परिस्थितीत वाहनधारक आणि प्रवाशांना मदत करण्याची जबाबदारीही टोलनाक्यांवर सोपविली आहे.
वाहनधारकाने 1033 या हेल्पलाइन क्रमांकाला फोन केल्यानंतर संबंधित वाहनधारकापासून जवळ असलेल्या टोलनाक्याला त्याबाबतची माहिती हेल्पलाइनमार्फत दिली जाते. तासवडे टोल प्रशासनाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेंद्रे ते सांगली जिल्ह्यातील पेठनाका या सुमारे 67 किलोमीटर अंतरापर्यंत मदत पुरविली जाते. आनेवाडी टोलनाक्याकडून परिसरातील शिरवळ ते शेंद्रेपर्यंतची सुमारे 56 किलोमीटर अंतरातील वहानधारकांना सेवा देण्यात येत आहे.
क्रेन, रुग्णवाहिकेची उपलब्धता
वाहनामध्ये अचानक बिघाड झाल्यास क्रेनची सुविधा दिली जाते. तसेच वाहनातील इंधन संपल्यास आवश्यक ते इंधन उपलब्ध करून देण्यात येते. वाहन अपघातग्रस्त झाल्यास रुग्णवाहिका उपलब्ध केली जाते. अपघातग्रस्त वाहन ओढून नेण्यासाठी क्रेन उपलब्ध केली जाते. प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले.
हेल्पलाइन क्रमांकावर साधा संपर्क
प्रवासादरम्यान अडचण आल्यास वाहन चालकाने तातडीने 1033 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करावा. आपण कोणत्या ठिकाणी आहोत, तसेच आपल्याला काय मदत हवी आहे, याची माहिती हेल्पलाईन प्रतिनिधीला द्यावी. मदत मिळेपर्यंत वाहनापासून सुरक्षित अंतरावर थांबावे.