

सातारा : गणेशोत्सव हा सर्वसामवेशक उत्सव आहे. या उत्सवात सर्व व्यावसायिकांबरोबरच लोककलाकारांना बाप्पा पावतो. उत्सवाचा जल्लोष वाढवण्यात लोककलांचा मोठा वाटा आहे. तर लोककलाकारांनाही उत्सवात त्यांच्या कलेच्या प्रदर्शनासाठी उत्तम व्यासपीठ मिळते. जिवंत देखाव्यांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये नाटिका, पोवाडा, भारुड अशा पारंपरिक लोककलांना यावर्षीदेखील विशेष मागणी राहणार आहे. तसेच डॉल्बीविरोधात वातावरण निर्माण झाल्याने पारंपारिक वाद्यांचा थाट वाढणार असल्याने ढोल-ताशाबरोबरच तुतारी, शिंग, हलगी वादकांची चंगळ होणार आहे.
गणेशभक्तांसाठी गणेशोत्सव म्हणजे समाज प्रबोधन व जनजागृतीबरोबरच मनोरंजनाची पर्वणी ठरत असतो. स्थानिक सण-उत्सवांमध्ये लोककलाकारांना विशेष महत्त्व असून कलाकारांच्या सादरीकरणामुळे सणाचा उत्साह दुणावतो. गणेशोत्सवामध्येही कलाकार विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचे कलाकौशल्य सादर करतात. यामध्ये भजन कीर्तनाबरोबरच नृत्ये, नाट्य, गायन, वादन यांचा समावेश असतो. लोककलाकारांना त्यांच्या कलेतून चांगली कमाई करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. लोककलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचे काम करतात. महाराष्ट्राच्या लोककलेत लोकनाट्याबरोबरच पोवाडा ही महाराष्ट्रातील एक शौर्यगाथा सांगणारी लोककला, जी पारंपरिक पद्धतीने सादर केली जाते. तसेच भारुड या लोककलेमध्ये विविध सामाजिक विषय परखडपणे मांडले जातात.
ध्वनी प्रदूषण व व्याधीग्रस्तांच्या आरोग्याच्या कारणास्तव यावर्षी नागरिकांनी डीजेला विरोध दर्शवला आहे. ज्येष्ठ नागरिकही रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे बाप्पांच्या उत्सवात डीजेला फाटा मिळून पारंपरिक वाद्यांचा थाट वाढणार आहे. डीजेचा आवाज कमी होणार असल्याने अनेक गणेश मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणुकांसाठी पारंपरिक वाद्याला पसंती दिली जाणार आहे. परिणामी पारंपरिक वाद्ये वाजवणार्या वादकांनाही मागणी वाढली आहे. बुकिंग वाढल्याने लय, तालाबरोबरच वादनाची कुवत वाढवण्यासाठी कसून सराव सुरू झाला आहे.