Kas Plateau: पहिल्याच दिवशी कासवर पर्यटकांची मांदियाळी

पठारावर हंगामाला दणकेबाज सुरुवात : विद्यार्थ्यांच्या सहलीही दाखल
Kas Plateau |
हंगामाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी पठारावर गर्दी केल्याचे दिसत आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

बामणोली : जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा गुरुवारी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी पठारावर पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळाली. ऑफलाईन आलेल्या हजारो पर्यटकांसह अनेक पर्यटकांनी ऑनलाईन नोंद करून हजेरी लावली. दरम्यान, परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सहलीही दाखल झाल्या होत्या. त्यामुळे कासच्या हंगामाला दणकेबाज सुरुवात झाली.

कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, कास पठार कार्यकारी समिती अध्यक्ष संतोष आटाळे, उपाध्यक्ष विजय वेंदे, माजी अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, प्रदीप कदम, ज्ञानेश्वर आखाडे, विमल शिंगरे, विकास किर्दत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हंगामाच्या पहिल्याच दिवशी 161 ऑनलाईन पर्यटकांनी हजेरी लावली तर ऑफलाईन आलेल्या हजारो पर्यटकांची रेलचेल झाली. पठारावरील फुले पाहण्यासाठी निसर्गप्रेमींनी गर्दी केलीच त्याचबरोबर पहिल्याच दिवशी विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कॉलेज कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी फुले पाहण्याचा आनंद लुटला. हंगामाला आता कुठे सुरूवात झाली असून दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत जाणार आहे. सध्या पठारावर पावसाची रिपरिप सुरू आहे.

हंगामाचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले, स्वच्छ सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर भर राहणार आहे. पर्यावरण पूरक उपाययोजना या वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. राजमार्गावर कुमुदिनी तलावापर्यंत ये- जा करण्यासाठी पर्यटकांना बैलगाडी सुविधा पुरवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा देखील यावर्षी वापर करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक वाहने वापरण्यावर आमचा भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अमोल सातपुते म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे ही वाहतूक कास पुष्प पठारावरून पलीकडे कास तलावाकडे जाईल व परत पर्यटकांना जाताना घाटाई देवी मंदिर मार्गे किंवा अंधारी कोळघर मेढा मार्गे ते परत जातील. ही वाहतूक ही शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी असेल. वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी देखील जबाबदारीने या ठिकाणी वागलं पाहिजे.

फुलांची नासधूस करणार्‍यांना दंड

सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग करूनच पर्यटकांनी कास पुष्प पठार पाहण्यासाठी यावे. एका दिवसासाठी तीन हजार पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जाणार आहे. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशीची गर्दी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक व पोलिस प्रशासन देखील मागवण्यात येणार आहे. हुल्लडबाज पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जे पर्यटक फुलांची नासधूस करतील अशांकडून 750 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. हंगाम पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सातपुते यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news