

सातारा : Mahabaleshwar news | सातारा जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरला आहे. महाबळेश्वरमध्ये १५ तर साताऱ्यात १६ अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. बाजारपेठमध्ये गर्दी फुलली असून पर्यटक वेण्णा लेक बोटिंगचा देखील आनंद लूटत आहेत.
दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. साताऱ्याचा पारा १६.१ अंशापर्यंत तर महाबळेश्वरचा पारा १५.४ अंशाखाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. यंदा थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी दसऱ्यानंतर थंडी पडू लागते आणि दिवाळीत थंडीचा कडाका जाणवतो. मात्र यावर्षी वातावरणातील बदल, लांबलेला परतीचा पाऊस यामुळे अभ्यंगस्नानाला थंडीची तीव्रता कमीच होती. दिवाळीच्या तोंडावर दोन दिवस हवेत गारठा जाणवला. मात्र पुन्हा तापमानात वाढ झाली. सध्या पहाटेच्यावेळी थंडीने हुडहुडी भरत आहे.