

सातारा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत महाबळेश्वर येथे सुरू करण्यात आलेल्या हनी बी टुरिझम, टेम्पल टूर ,व्हिलेज टूर ,स्ट्रॉबेरी टूर, हेरिटेज टू ऍग्रो टूरला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पर्यटन विभागामार्फत हा पहिलाच प्रयोग करण्यात आला होता. या विविध ठिकाणांना 7 हजार 710 पर्यटकांनी भेटी दिल्या व तेथील नाविन्यपूर्ण बाबींचे अवलोकन केले.
ऍग्रो टुरिझम, हनी बी टुरिझमला भेटी देऊन तेथील मध व स्ट्रॉबेरीची खरेदी सुद्धा पर्यटकांनी केली. पर्यटकांनी ग्रामीण पर्यटनाचा पुरेपूर आस्वाद घेतला. मधाचे गाव असलेल्या मांघर येथून साडे चार लाख रूपयांचा मध खरेदी केला.
पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी एन पाटील, इंटरनॅशनल अफेअर्स योशियो यामाशिता सान यांनीही या ठिकाणी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी मांघर समितीचे अध्यक्ष महादेव जाधव यांनी पर्यटकांना प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी दिग्विजय पाटील, सरपंच गणेश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.