

सातारा : यावर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे. भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आहे. बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने वाटाणा, शेवगा यांच्या दरात तेजी आली आहे. किलोचा दर वाटाणा दोनशेच्या घरात तर शेवगा शंभरी पार झाला आहे. तर टोमॅटोचे दर घसरले असून किरकोळ विक्री १० ते २० रुपये किलोने होत आहे.
कष्टाने पिकवलेले पिक कवडी मोलाने विकावे लागत असल्याने टोमॅटोची लाली उतरली आहे. जिल्ह्यात उपलब्ध पाणी साठा घटू लागला आहे. आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा शेती व्यवसायाला सर्वात जास्त फटका बसणार असून तर्कारी पिकांचे उत्पादन घटले आहे.
सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काही फळभाज्या व पाले भाज्यांची आवक कायम आहे. तर वाटाणा, पावटा, शेवगा यांची आवक कमी असल्याने दर वाढले आहे. सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ताटातून हिरवा वाटाणा गायब झाला आहे. सण समारंभांच्या जेवणासाठी फ्रीजर्व्ह केलेला प्रक्रियायुक्त वाटाण्याचा पर्याय निवडला जात आहे. टोमॅटोचे दर घसरल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.