

सातारा : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणार्या पालख्या तसेच भाविक आणि वारकर्यांसाठीच्या सोयी- सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याबाबत नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानुसार वारी मार्गावर मानाच्या पालख्या, वारकरी, भाविकांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, रस्ते दुरुस्तीसह ठिकठिकाणी वारकर्यांना आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्याचेही ना. शिवेंद्रराजेंनी सांगितले.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले. पंढरपूरला जाणार्या पालख्या, भाविक व वारकर्यांना ‘आषाढी एकादशी 2025’, गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/ पोलिस, संबंधित आर.टी.ओ. यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलिस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध करुन द्यावेत.
पंढरपूरला जातेवेळी व परत येतेवेळी दि.18 जून ते 10 जुलै या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक व वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी असेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसे स्टिकर्स/ पासवर नमूद करण्यात येणार आहे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरता ग्राह्य धरण्यात येतील. दर 20 ते 25 किमी अंतरावर पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहिका, रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीचे मटेरियल, क्रेन आदी व्यवस्था ठेवावी. बर्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशा ठिकाणी वाहतूक सुरक्षिततेच्या द़ृष्टिकोनातून संबंधित महामार्ग प्राधिकार्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.
महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणार्या सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट द्यावी. परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी गरजेनुसार संबंधित पोलिस ठाणेकडे या अनुषंगाने कुपन/ पास प्राप्त करुन घ्यावेत. राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना भाविकांच्या मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे. ग्रामीण पोलिस/ आर.टी.ओ. यांच्यामार्फत दिलेल्या पासची संख्या सादर करावी. यानंतर पथकरातून सवलत दिल्यानंतर संबंंधित उद्योजकांना त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी अधिकचे मनुष्यबळ, ट्रॅफिक वॉर्डन व हँड होल्डींर्ग मशिन ठेवण्यात यावेत. पथकर कंत्राटदारांनी पालखी सोहळा कालावधीत जादाचे ट्रॅफिक वरदान डेल्टा किंवा एम.एस.एस. फोर्स उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना केल्याचे ना. शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.