

कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून तीन नर वाघ एसआरटी टी 1, टी 2, टी 3 यांचा वावर सुरू आहे. त्यांनी आपल्या हद्दी निश्चित केल्या आहेत. टी 1 व टी 2 सेनापती व सुभेदार हे प्रामुख्याने चांदोली भागात फिरत आहेत. तर कोयना भागात बाजी याने आपले हद्द क्षेत्र निश्चित केले आहे. विशेष म्हणजे अखिल भारतीय व्याघ्र गणना फेज 1 वेळेस आलेल्या काही स्वयंसेवक यांना कोयना भागात पाली व जुगंटी परिसरात मोठ्या मोठ्याने बाजी वाघाच्या डरकाळ्या ऐकण्यास मिळालेल्या आहेत, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
बाजी वाघाने भैरवगड ते पाली/मालदेवपर्यंत आपली हद्द निश्चित केली असून कोयना क्षेत्रात फिरत आहे, शिकार करीत आहे. कोयनेच्या जंगलात वनविभागाने लावलेल्या काही कॅमेऱ्यामध्ये एसआरटी टी 3 बाजी या नर वाघाचे फोटो व व्हिडिओ नुकतेच आढळून आले आहेत. त्याचा पायाचा पंजा साधारण 16 बाय 16 सेंटीमीटर असा आहे. हा पूर्ण वाढलेला जवळपास 3 ते 3.5 वर्षाचा मोठा असा नर वाघ आहे.
नुकतेच राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी फेज 1 चे अखिल भारतीय व्याघ्र गणनाचे आयोजन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात केले होते. 12 ते 17 जानेवारी असे फेज 1 चे सर्वेक्षण होते. सर्व भारतातून वेगवेगळ्या राज्यातून जवळपास 75 स्वंयसेवक या सर्वेक्षणासाठी आले होते. यासाठी केरळ, कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार तसेच महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून स्वयंसेवक आले होते. सर्वेक्षणादरम्यान विविध ठिकाणी कॅमेऱ्यामधील विविध प्राण्यांची हालचालींची ही नोंद घेतली आहे.