

भुईंज : ‘लांडगा आला रे आला’ ही म्हण सर्वश्रुत आहे. वारंवार आपण एखाद्याने अफवा पसरवून लोकांना घाबरवले तर ‘लांडगा आला रे आला’ ही बोलीभाषेतील म्हण बोलून दाखवतो. नेमका असाच प्रकार चक्क ओझर्डे (ता. वाई) येथील देशमुखनगर शिवारात पट्टेरी वाघ आला असल्याच्या अफवेने वाई तालुक्यातील प्रशासन अलर्ट झाले आणि वन विभागाने ड्रोन कॅमेरे लावून शोधाशोध सुरू केली. मात्र, संबंधित मेसेज हा अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सोशल मीडियावर दिशाभूल करणारा व अफवा पसरवणारा मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गौरव अनिल काळे (रा. खानापूर, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. देशमुखनगर शिवारात पट्टेरी वाघ आल्याची अफवा शुक्रवारी दुपारनंतर वेगाने पसरली. त्यामुळे वन विभाग व पोलिस यंत्रणा कामाला लागली.
ही अफवा पसरवून तारांबळ उडवून देणार्याने मोबाईलवरून चक्क पट्टेरी वाघाचा फोटो एडिट करून मेसेज व्हायरल केला होता. त्यामुळे आणखीचं भीतीचे वातावरण पसरले पण परिस्थितीचा अंदाज आलेल्या वनविभागाचे अधिकारी यांनी संबंधीत फोटो हा बनावट असल्याचे शोधून काढले. चुकीचे पद्धतीने अफवा पसरवून फसवणूक करणार्याचे पितळ उघडे केले.
घडलेल्या प्रकारानंतर ज्याने फोन केला त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मस्करी म्हणून हा प्रकार केल्याचे सांगितले आणि प्रशासनासह सर्वांनीच सुस्कारा सोडला. दरम्यान वनविभागाने खोटी अफवा पसरवून दिशाभूल केली म्हणून अखेर गौरव अनिल काळे याच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास सपोनि रमेश गर्जे करत आहेत.
अफवा पसरवणे हा गुन्हा
चक्क पट्टेरी वाघ ओझर्डे येथे आल्याच्या फोनमुळे दिवसा 12 वाजता वनविभाग अधिकारी चांदक येथील वन्यजीव सप्ताह कार्यक्रम सोडून घटनास्थळी पोहोचल्याचे वनपाल संग्राम मोरे व भुईंज वनपाल दिलीप वनमाने यांनी सांगितले. अफवा पसरवणे व प्रशासनास फसवणे हा गुन्हा आहे, असे प्रकार थांबले नाहीत तर कडक कार्यक्रम राबवू, असा इशारा पोलिस निरीक्षक रमेश गर्जे व पीएसआय पतंग पाटील यांनी सांगितले.