बरडजवळील भीषण अपघातात तिघे ठार

खेड बु॥, पाडेगाव व वेटणे गावांवर शोककळा; कंटेनर-कारची धडक
Satara Accident |
मृत सागर चौरे, भाऊसो जमदाडे, नीलेश शिर्केPudhari Photo
Published on
Updated on

फलटण : फलटण-पंढरपूर रस्त्यावरील बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे भरधाव वेगात असणार्‍या एका कंटेनरने कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तिघे ठार झाले. मृतांमध्ये खंडाळ्यातील खेड बुद्रुक व पाडेगाव तसेच खटावमधील वेटणे येथील युवकाचा समावेश आहे. या तिन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संशयित कंटेनरचालक पसार झाला आहे.

सागर रामचंद्र चौरे (वय 34, रा. पाडेगाव ता. खंडाळा), भाऊसो आप्पा जमदाडे (45, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) व नीलेश चंद्रकांत शिर्के (40, रा. वेटणे, ता. खटाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कारमालक सूरज संतोष खरात (रा. पाडेगाव) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Satara Accident |
Satara Accident : देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात आजोबासह नातू ठार, ५ जखमी

याबाबत मिळालेली माहिती अशी, भाऊसो जमदाडे व नीलेश शिर्के यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा विजापूर येथे एक ट्रक बंद पडला होता. हा ट्रक दुरुस्त करून तो लोणंदमध्ये आणायचा होता. यासाठी नीलेश व भाऊसो यांनी मॅकेनिक सागर चौरे यांना सोबत घेतले होते. हे सर्वजण सूरज खरात यांची चार दिवसांपूर्वी घेतलेली नवी कोरी कार घेऊन विजापूरला गेले होते. विजापूरमधील बंद पडलेल्या ट्रकचे काम झाल्यानंतर दिवाळी सणासाठी हे सर्व दि. 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री विजापूरहून निघाले होते. त्यांची कार पहाटे 4.30 च्या सुमारास बरड गावच्या हद्दीत आली असता या कारला फलटण- पंढरपूर रोडलगत बागेवाडी पेट्रोल पंपाच्या जवळ फलटणहून पंढरपूरकडे जाणार्‍या कंटेनरने (क्रमांक एम. एच. 46. सीएल 9651) समोरा-समोर धडक दिली.

कंटेनरने दिलेल्या धडकेत कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला. परंतु, बरड गावच्या पुढे आल्यानंतर राजुरी गावच्या हद्दीत या कंटेनरचा रेडिएटर फुटल्याने चालक कंटेनर तिथेच सोडून पसार झाला. या भीषण अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली.

गुरूवारी नरकचतुदर्शी असल्याने पहिले अभ्यंगस्नान सर्वत्र उत्साहात पार पडले. मात्र, या अपघातामुळे खेड बुद्रक, पाडेगाव व वेटणे गावावर शोककळा पसरली. ऐन सणातच या भीषण अपघातामुळे सर्वांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news