

कराड : रानडुकराची शिकार करणार्यांवर वन विभागाने कारवाई केली. संशयितांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आबाईचीवाडी (ता. कराड) येथे वन विभागाने ही कारवाई केली.
याबाबत वनविभागाने सांगितले की, मिळालेल्या गुप्त माहितीवरून अबईचीवाडी (ता. कराड) येथील पांडुरंग किसन सुर्वे यांच्या शेतात वन्यप्राणी रानडुक्कर यांची अवैध शिकार झाल्याचे वनविभागाला समजले. त्यावरून वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रानडुक्कर वन्यप्राण्याचे मांस घटनास्थळी मिळून आले.
दरम्यान, संशयितांना सुगावा लागल्यामुळे त्यांनी घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळी वन्यप्राणी रानडुकराचे मांस व इतर साहित्य जप्त केले. वनअधिकार्यांनी परिसराची कसून तपासणी केली असता, प्रदीप संपत सूर्वे, प्रविण शिवाजी सुर्वे, रामचंद्र ज्ञानू जाधव (सर्व रा. अबईचीवाडी, ता. कराड) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानुसार प्रथमदर्शनी त्यांनी गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही वनविभागाने सांगितले. त्यांचेवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला. सदर कारवाई सातारचे उपवनसंरक्ष किरण जगताप, सहायक वनसंरकक्ष महेश झांजुर्ण यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल संतोष जाधवर, पूजा खंडागळे, रमेश जाधवर, सचिन खंडागळे व वनकर्मचारी यांनी केली.
वन्यप्राण्याची शिकार व अवयवांची तस्करी करीत असताना कोणी निदर्शनास आलेस टोल फ्री नंबर 1926 वरती संपर्क साधावा तसेच नजीकच्या वनक्षेत्रपाल कार्यालयास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.