परळी : सातारा-ठोसेघर रस्त्यावरील सज्जनगड फाटा येथील सुमारे २०० फूट खोल दरीत पर्यटकांची कार कोसळली. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी पुणे जिल्ह्यातील असून ठोसेघर येथील धबधबा पाहून माघारी येत असताना हा अपघात झाला आहे.
नाद पाटील, सौ. नेहा नाद पाटील, खुशबू शर्मा (सर्व रा. बाणेर, पुणे) अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत प्राथमिक माहिती अशी, हे तिघेजण शुक्रवारी सकाळी ठोसेघर येथे
धबधबा पाहण्यासाठी गेले होते. तेथून माघारी येत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उरमोडी डॅम व्ह्यू पॉईंट येथे कार चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. अशातच टायर घसरले व कार थेट सुमारे २०० फूट दरीत खाली गेली. परिसरात असणाऱ्या पर्यटक व स्थानिकांनी आरडाओरडा केला. त्यांनी तत्काळ ही घटना राजूभैया भोसले तसेच पोलिस निरीक्षक तांबे यांना कळवली. त्यांनी तत्काळ मदतीसाठी चक्रे फिरवली. खोल दरीत जाऊन अंबवडे येथील नितीन देशमुख, नीलेश देशमुख, सागर देशमुख, विजय जिमन यांनी जखमींना दरीतून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार दरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू केले.