

खटाव : माण-खटावसारख्या दुष्काळी भागाचे परिवर्तन करण्याचा संकल्प ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंनी अथक प्रयत्नांनी पूर्णत्वाकडे आणला आहे. इथल्या जनतेला पाण्याचे जे स्वप्न दाखवले ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. ना. गोरेंना मंत्रीपदापेक्षा या भागातील पाणीयोजना महत्वाच्या होत्या.
या वाटचालीत त्यांना अनेकांनी निरर्थक विरोध केला. ना. गोरेंना कुणीही थांबवू शकत नाही. तसा प्रयत्न करणारे पाला पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. जिहेकठापूर योजनेच्या उर्वरित कामांसाठी लागणारा निधी देवून दुष्काळमुक्ती साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सगळे सरकार जयकुमार गोरेंच्या पाठिशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केले.
राणंद तलावात जिहे-कठापूर योजनेच्या आंधळी उपसा सिंचन योजनेद्वारे आलेल्या पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन पाटील, आ. मनोज घोरपडे, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, अधिक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, अमोल निकम, सोनिया गोरे, अरुण गोरे आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. विखे-पाटील म्हणाले, जिहेकठापूर योजनेच्या उर्वरित कामांसाठी तीन हजार कोटींचा निधी द्यायचा आहे. 2029 पर्यंत या योजनेद्वारे 60 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि आमच्या सरकारचे धोरण असल्याचेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, 2009 पासून दुष्काळमुक्तीचे उद्दिष्ट समोर ठेवून पाठपुरावा केला. पाणी योजनांची अनेक कामे मार्गी लावली आणि त्याचेच फलित म्हणून आज जिहे-कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात आले आहे. बारामती, फलटण, सातारमधून मला रोखण्यासाठी नेहमीच मोठी ताकद लावण्यात आली. माझ्यासमोर अनेक संकटांची मालिका षडयंत्र रचून उभी करण्याचे नेहमीच प्रयत्न झाले. मात्र, जनतेच्या पाठिंब्यावर प्रत्येक संकटावर मात करत पुढे आलो.
जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने लढलो. अनेक षडयंत्रे रचली गेली तरी एकदा, दोनदा नव्हे तर चार वेळा आमदार आणि आता मंत्री झालो. या प्रवासात मी संपलो नाही मात्र मला संपवायला निघालेले घरी बसले. शकुनी आजपर्यंत कधीही जिंकला नाही याचे उदाहरण फलटणकरांच्या रुपाने आपल्या सर्वांना पहायला मिळाले. मी प्रस्थापितांना मुजरा करत नाही, त्यांच्यापुढे झुकत नाही याचाच अनेकांना पोटशूळ आहे. मी तसे केले नाही म्हणूनच माण - खटावमध्ये पाणी आणू शकलो. माता भगिनी, युवक आणि शेतकर्यांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करु शकलो. जलसंपदा मंत्र्यांनी आमच्या दुष्काळमुक्तीच्या अंतिम लढाईत सहकार्य करुन जिहे-कठापूर उर्वरित आणि औंध उपसा सिंचन योजनेला निधी देवून सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, भिमराव पाटील, धैर्यशील कदम, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश सत्रे, प्रशांत गोरड, अनिल माळी, नगराध्यक्ष निलम जाधव, रेश्माताई बनसोडे ,दादासो काळे, डॉ. संदीप पोळ, शिवाजीराव शिंदे, माण बाजार समितीचे सभापती विलासराव देशमुख, सोमनाथ भोसले, सिध्दार्थ गुंडगे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
माण आणि खटाव तालुक्यात आजपर्यंत विविध योजनांद्वारे आलेल्या पाण्याचे पूजन करताना ना. गोरेंचा आनंद गगनात मावेनासा होतो. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांनी दुष्काळी खटाव तालुक्यातील सिमेंट बंधार्यात बोटींगचा अनुभव दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेद्वारे आलेल्या पाण्यात नौकाविहाराचा आनंद लुटला होता. आताही राणंद तलावात आलेल्या पाण्यात भिजण्याचा आनंद ना. विखे पाटील, ना. गोरेंनी घेतला.