

पुसेसावळी : औंध पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अंकित पुसेसावळी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत अलीकडच्या काळात चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अनेक गावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतानाही चोरट्यांचा छडा वेळेत लागत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या परिसरात घरफोडी, दुकाने फोडणे, शेतीपंप, मोटारसायकली तसेच घरातील मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत; मात्र चोरी झाली तरी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘तक्रार करूनही ठोस कारवाई होत नाही, वेळ आणि खर्च वाया जातो,’ अशी भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत असून त्यामुळे अनेक चोरीच्या घटना पोलिसांच्या नोंदीपर्यंत पोहोचत नाहीत. चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा व दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. रात्रीची गस्त, संशयितांवर नजर ठेवणे, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अशा उपाययोजना कागदावर दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या समित्यांची पुढील भूमिका काय, त्यांना आवश्यक प्रशिक्षण, साधनसामग्री तसेच पोलिसांशी समन्वय राहतो का?, असा सवालही उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी ओळखण्यात व अटक करण्यात होणाऱ्या विलंबामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘चोऱ्यांवर नियंत्रण कधी येणार आणि चोरट्यांवर ठोस कारवाई केव्हा होणार?’ असा थेट सवाल आता ग्रामस्थांकडून पोलिस प्रशासनाला विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर औंध पोलिस ठाणे व अंकित पुसेसावळी दूरक्षेत्राने विशेष पथक नेमणे, रात्रीची गस्त वाढवणे, सीसीटीव्ही विश्लेषणासाठी तांत्रिक मदत घेणे तसेच तक्रारदारांना विश्वासात घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा वाढते चोरीचे प्रमाण ग्रामीण शांततेस गंभीर धोका ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.