

सातारा : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाने महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांना आता आकाश ठेंगणे झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नैराश्याचे वातावरण आहे. नववर्षात नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून यासाठी मविआच्या घटक पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत अपेक्षित आहे. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र, याठिकाणी आठही मतदार संघात आता महायुतीचे आमदार निवडून आले आहेत.
सातारा आ. शिवेंद्रराजे भोसले, वाई आ. मकरंद पाटील, माण-खटाव आ. जयकुमार गोरे, कोरेगाव आ. महेश शिंदे, कराड उत्तर आ. मनोज घोरपडे, कराड दक्षिण आ. डॉ. अतुल भोसले, फलटण सचिन पाटील, पाटण आ. शंभूराज देसाई हे सर्वजण निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीतील आ. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, अरुणादेवी पिसाळ, सत्यजित पाटणकर, अमित कदम, हर्षद कदम अशा दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात व मतदारसंघात पक्षनिहाय वर्चस्व व प्रसंगी निष्ठादेखील वेगवेगळ्या आहेत. संबंधित विभागात वर्चस्व असलेला आमदार आपल्या मित्रपक्षांना कसे सामावून घेणार, न्याय देतात की पुन्हा मित्रपक्षांमध्येच जागावाटपावरून कलगीतुरा रंगणार, याविषयी उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणूक काळात बंडखोरी केलेल्या किंवा बंडखोरांना साथ दिलेल्यांना निश्चित भूमिका घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत काही प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून पक्षविरोधी भूमिका घेत आपापल्या पसंतीच्या उमेदवारांना साथ दिली.