

सातारा : छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी सातार्याला ऐतिहासिक मराठा साम्राज्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळख दिली आहे. शाहू महाराजांनी सातार्याचा विकास केला. त्यांच्याशी संबंधित असणार्या वस्तू, दस्तावेज व छायाचित्रे याचे समग्र दर्शन घडवणारी 3 हजार 40 फुटांची भव्य गॅलरी सातार्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सातारकरांना एक नवीन पर्वणी मिळणार आहे. या माध्यमातून राजधानी असलेल्या सातार्याच्या जडणघडणीची माहिती सातारकरांसमोर येणार आहे.
छत्रपती थोरले शाहू महाराज यांची आज रविवार, दि. 15 डिसेंबर रोजी 275 वी पुण्यतिथी आहे. थोरले शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचे पुत्र. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले, मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला. अशा थोरल्या शाहूंची समाधी संगममाहुली आहे. सातारानगरीची स्थापना इ.स. 1721 साली झाली असून शाहूंचा इतिहास व सातारा कसा होता हे आता समोर येणार आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयातील तब्बल 3040 फूट अशा भव्य गॅलरीत सातारानगरीचे संस्थापक थोरले शाहू महाराज यांच्या स्मृती जपण्याचा मानस आहे. छत्रपती शाहू महाराजांची मोडी लिपीतील अस्सल पत्रे, शाहूंच्या काळात सातारा शहरात उभारण्यात आलेल्या वाड्यांची छायाचित्र, त्यांचा आवडता मदारी हत्ती आणि वाघाच्या हल्ल्यातून महाराजांना वाचवणारा कुत्रा खंड्या यांच्या समाधीची छायाचित्रे, त्यांच्या काळातील पाणवठे, खुद्द छत्रपती शाहू महाराजांची संगम माहुली येथील समाधी यांची छायाचित्रे व माहिती या गॅलरीत पर्यटकांना पहायला मिळणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात उभारलेला अदालतवाडा, रंगमहाल, तख्ताचावाडा, बेगम मस्जिद, चारभिंती हुतात्मा स्मारक असे वडे व ज्या पेठांची निर्मिती केली. त्यांची छायाचित्रे हे या दालनाचे खास वैशिष्ट्य असणार आहे. यासह तत्कालीन राजघराण्याची तहान भागवणार्या नागझरी तलावाचे छायाचित्र या गॅलरीत असणार आहे. शिवाजी संग्रहालयातील या भव्य गॅलरीत शाहकालीन छायाचित्रांची खास पद्धतीने मांडणी करण्यात येणार आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने ऐतिहासिक बाज असलेल्या या गॅलरीत छत्रपती शाहू महाराजांचे अस्सल चित्र लावण्यात येणार असून हे या गॅलरीची शोभा वाढवणार आहे.
थोरले छत्रपती शाहू महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर अजिंक्यतारा किल्ल्यावर राज्याभिषेक करवून घेत तेथूनच राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. इ.स. 1721 साली सातारा शहराची स्थापना केली. हे शहर स्थापित करताना शहराची असणारी भौगोलिक परिस्थिती कशी होती, त्यानंतर त्यांनी काय बदल केले, शहरातील पेठांची स्थापना कशी केली हा सर्व इतिहास सातारकरांच्या समोर आणला जाणार आहे. यात प्रत्येक छायाचित्रांमध्ये सर्व माहिती असणार आहे. लवकरच याचे काम सुरु होणार असून वर्षभरात जुना सातारा पाहावयास मिळणार आहे.