कुस्तीला उत्तेजन देण्यासाठी शासन प्रयत्नशील : ना. एकनाथ शिंदे

महाराष्ट्र केसरी स्पर्धा समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री ना. एकनाथ शिंदे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, ना. शंभूराज देसाई, पद्मश्री पै. सतपाल, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, साहेबराव पवार व इतर.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा समारोप कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री ना. एकनाथ शिंदे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, ना. शंभूराज देसाई, पद्मश्री पै. सतपाल, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, साहेबराव पवार व इतर.

सातारा;  पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला कुस्ती खेळाची मोठी परंपरा लाभली असून या मातीत अनेक मल्ल निर्माण झाले. निवृत्तीनंतरही मल्लांनी मार्गदर्शन करुन नवे मल्ल घडवायला हवेत. ऑलिंपिकवीर कै. खाशाबा जाधव यांना पद्मश्री किताब मिळायला हवा. महाराष्ट्राचे नाव जगभर होण्यासाठी ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकायला हवे. कुस्तीला उत्तेजन देण्यासाठी राज्य शासन सर्वतोेपरी सहकार्य करेल, असे आश्वासन राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिले.

सातार्‍यातील श्री. छ. शाहू जिल्हा क्रीडा संकूल येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषद व जिल्हा तलीम संघाच्यावतीने आयोजित 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 संपन्न झाल्या. यावेळी सहकारमंत्री व पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, नितीन बानुगडे-पाटील, आ. चंद्रदीप नरके, महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, धवलसिंह मोहिते, माजी खासदार अशोक मोहोळ, पद्मश्री पै. सतपाल, हिंदकेसरी दिनानाथ सिंह, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अभिनेत्री दिपाली सय्यद, जि. प. सदस्य दिपक पवार, सुधीर पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, पुरुषोत्तम जाधव प्रमुख उपस्थित होते.

ना. एकनाथ शिंदे म्हणाले, ज्येष्ठ पैलवानांनी निवृत्त झाल्यानंतरही मार्गदर्शन करुन नवे पैलवान घडवले पाहिजेत. वस्तादांचांही पैलवानांनी मान राखला पाहिजे. पैलवान होण्यासाठी कित्येक वर्षे मेहनत करावी लागते. राजकारणातील डावपेच वेगळे व सोपे असतात. मात्र कुस्तीतील डावपेच मेहनतीचे असतात. महाराष्ट्राला कुस्तीची, वस्तादांची उत्तम परंपरा आहे. वस्तादांनी उत्तम मल्ल घडवले आहेत. ऑलंपिकमध्ये खाशाबा जाधव यांनी ब्राँझ पदक मिळवले होते. महाराष्ट्राचे नाव जगभर होण्यासाठी ऑलंपिकमध्ये कुस्ती प्रकारात गोल्ड मेडल मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने तयारी केली पाहिजे. राज्य शासनाकडून कुस्तीला उत्तेजन मिळावे यासाठी शक्य तेवढे सहकार्य केले जाईल. खाशाबा जाधव यांना पद्मश्री किताब मिळायला हवा.

बाळासाहेब लांडगे म्हणाले, महाराष्ट्राने अनेक मल्ल घडवले. राजर्षी शाहू महाराजांनी मल्ल विद्या जतन केली. स्व. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, शरद पवार, बाळासाहेब मोहोळ यांनी ही परंपरा जोपासली. पैलवानांची बंद झालेली पेन्शन योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली. सुधीर पवार म्हणाले, जिल्हा तालीम संघाने स्वत:ची ओळख निर्माण केली.स्वाभिमानाने राहणारी ही संघटना कुणापुढेही झुकली नाही. तालीम संघ हा जिल्ह्याचा मानबिंदू आहे. जुन्या संस्थांना सापत्न वागणूक दिल्यास तो यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा घात ठरेल. तालीम संघाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका असे त्यांनी सांगितले.

दिपक पवार म्हणाले, या कुस्ती स्पर्धेसाठी ना. रामराजे, ना. एकनाथ शिंदे, ना. बाळासाहेब पाटील यांनी सढळ हस्ते मदत केली. ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी पदाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाने सहकार्य केल्याचे सांगितले. माझ्या वडिलांनी 59 वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली होती. आज त्यांचे वय 97 आहे आणि दुसर्‍यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा सातार्‍यात होत आहे, याचा मला अभिमान आहे. स्पर्धा यशस्वी करणार्‍या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असेही ते म्हणाले.

खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांची कुस्ती लावूया

छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मुख लढतीवेळी राजकीय व्यासपीठावरून जोरदार कोपरखळ्या झाल्या. खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांना महाराष्ट्र केसरीचे निमंत्रण नव्हते. मात्र अंतिम सामन्यासाठी ते दोघेही व्यासपीठावर होते. दोघांनाही व्यासपीठावर पाहून सुधीर पवार यांनी डाव टाकला. ते म्हणाले, उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यातच कुस्ती लावूया. त्यावर दोघेही खळखळून हसले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news