सातारा : पुढारी वृत्तसेवा
घरोघरी गणपती बाप्पा व गौरी आगमन झाले असून त्यांच्या सरबराईसाठी भक्तगण सरसावले आहेत. सजावट, पूजा, महाआरतीमुळे प्रसादासाठी मिठाईबरोबरच फळांना मागणी वाढली आहे. गौरीच्या हळदी-कुंकू समारंभामुळे हार, वेणी, गजर्यांना मागणी वाढली आहे. तर बुधवारी गौरीच्या सजावटीमध्येही मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने फुलबाजार तेजीत राहिला. गौरींच्या फुलोर्यांसाठी पानपत्री व दुर्वा खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
गणेशोत्सवातील गौरी आवाहन व गौरी पूजनाचे दोन दिवस अतिशय महत्वाचे असतात. गणपतीबरोबरच माहेरवाशीण गौरींचा दोन दिवस भरपूर पाहुणचार करण्यात येतो. त्यांच्या स्वागताबरोबर पाठवणीपूर्वी जागर व ज्येष्ठा गौरीचे खेळही घेतले जातात. तसेच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शहरासह ग्रामीण भागातही गौरीपूजन जल्लोषात होत आहे. गौरी व गणपतीसाठी हार, वेण्या गजरे तसेच फुलोर्यासाठी पानपत्री, दुर्वा यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाल्याने फुलबाजार तेजीत आला आहे. झेंडू 150 ते 200, शेवंती 300 ते 500, गुलाब 500 ते 600, निशीगंधा 1000 ते 1200 रुपये किलोने विक्री झाली. उत्सव काळात फुलांची मागणी व दरही वाढल्याने फुलउत्पादक शेतकरी सुखावला आहे.
गौरींच्या फराळात मिठाईबरोबरच सर्वप्रकारच्या फळांना स्थान असल्याने फळांना मागणी वाढली होती. उत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर फळबाजारात फळांची आवकही वाढली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत सातारा शहर व परिसरात फळे, फुले व पानपत्री विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरींच्या पुढे विढे घेतले जात असल्याने खाऊच्या पानांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. गौरी आवाहन व पूजन या दोन दिवसांमध्ये फळे व फुलांच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली.
घरगुती गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने गौरी पूजनादिवशी सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले जाते. आधीच गणेशोत्सव त्यात ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे वास्तव्य असा शुभयोग जुळल्याने हा महापूजेचा योग साधन्यात आला. एकाच दिवशी अनेक ठिकाणच्या आर्डर असल्याने दिवसभरच पूजेसाठी भटजींची लगबग सुरू होती. नवीन व्यवसाय व शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी देखील आजचा शुभमुहूर्त साधल्याने भटजींना मागणी वाढली होती.