

सातारा : विशाल गुजर
जिद्द आणि आत्मविश्वासाने आलेल्या संकटाचा लक्ष्यभेद करत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावरच प्रवीण जाधवला ऑलिंपिकचे तिकीट मिळाले आहे. प्रवीणच्या सांघिक संघाने पात्रता फेरीत यश मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. सेमी फायनलसाठी प्रवीणच्या संघाची आज लढत होत आहे. त्यामुळे प्रवीणच्या लक्ष्यभेदाकडे जिल्हवासियांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
फ्रान्समधील पॅरिस येथे ऑलिंपिक स्पर्धेचा प्रारंभ झाला आहे. भारताच्या तिरंदाजांनी ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी कमाल केली. पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी पात्रता फेरीत यश मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केला आहे. पुरुष गटात भारताने यावेळी चीन, जपान आणि इटलीसारख्या देशांना पिछाडीवर टाकले. तिरंदाजी क्रीडा प्रकारातील सांघिक विभागात प्रवीण जाधव याने धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय यांच्या साथीने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताच्या पुरुष संघात यावेळी प्रवीण जाधव, धीरज आणि तरुणदीप हे तीन खेळाडू आहेत. भारताच्या पुरुष संघाने यावेळी दमदार कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. भारताने या स्पर्धेत 2013 गुण पटकावत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यामध्ये दक्षिण कोरियाने 2049 गुण मिळवत अव्वल तर फ्रान्सने 2025 गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
भारताच्या धीरज बोम्मादेवराने गुरुवारी ऑलिंपिकमध्ये एस्प्लानेड डेस इनव्हॅलिड्स या प्रकारात पुरुषांच्या तिरंदाजी रँकिंग फेरीत तरुणदीप राय 14 व्या आणि प्रवीण जाधव 39 व्या स्थानावर होता. मात्र, त्यानंतर उल्लेखनीय खेळ करत त्यांनी चौथे स्थान पटकावले. या रँकिंग फेरीनंतर भारत एकूण 2013 गुणांसह 3 व्या स्थानावर आहे. 2049 सह दक्षिण कोरिया या यादीत अव्वल आहे. त्यानंतर फ्रान्स 2025 सह दुसर्या स्थानी आहे. बोम्मादेवराने 681, तर रायने 674 आणि प्रवीण जाधवने 658 गुण मिळवले. सोमवार दि. 29 रोजी दुपारी 1 वाजता या संघाची पुढील लढत होणार आहे. तिरंदाजीत कोलंबिया आणि टर्की दोन देशांमधील जे विजेते असतील त्यांच्याशी भारताशी उपांत्य फेरीत लढत होणार आहे.
1952 मध्ये हेलसिंकी येथील झालेल्या ऑलिंपिकमध्ये कराड तालुक्यातील खशाबा जाधव यांनी कुस्ती या प्रकारात कांस्य पदक पटकावले होते. यानंतर सन 2016 मध्ये माणदेशील एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणार्या ललिता बाबर हिने रिओ डी जानेरो येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, तिला यामध्ये पदक पटकावता आले नाही. 2020 रोजी टोकियो ऑलिंपिकसाठी प्रवीण जाधवची निवड झाली होती. त्यावेळी तो अपयशी ठरला मात्र, पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिंपिकसाठी पात्र झालेला सातार्यातील तो तिसरा खेळाडू आहे.