कास बहरू लागले; फुलांनी अन् पर्यटकांनीही

सलग सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी : दोनच दिवसांत अडीच हजार जणांची भेट
Kas Pathar Satara News
सात वर्षांनंतर उमलणार्‍या टोपली कारवी या फुलाने पठार बहरू लागले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार बहरू लागले आहे. अद्याप हंगाम सुरू नसला तरी पावसाने उघडीप दिल्याने पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तब्बल अडीच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. सलग दोन दिवस सुट्ट्या असल्याने पठारावर पर्यटकांची वर्दळ पहायला मिळाली. तसेच मॅरेथॉनसाठी मुक्कामी आलेल्या धावपटूंनीही कासला धावती भेट दिली.

Kas Pathar Satara News
‘कास’ पठार फुलांनी बहरू लागले!

श्रावण महिन्याची अखेर सुरू झाल्याने कास फुलू लागले आहे. सध्याच्या घडीला कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी या फुलाने पठार व्यापले आहे. त्याच्याच जोडीला कोळी कारवी व इटारी कारवी ही फुलेही पर्यटकांना खुणावू लागली आहेत. या तीनही प्रकारांतील कारवी एक ते दोन महिने राहणार असून यावर्षी पर्यटकांना वेगळीच अनुभूती पहावयास मिळणार आहे. टोपली कारवीसह पठारावर चवर, दीपकांडी, आभाळी, सीतेची आसवे, सोनकी, तेरडा, भारांगी, धनगरी फेटा, तुतारी, कुमुदिनी तलावामध्ये कुमुदिनी यासह टप्प्याटप्प्याने कास पुष्प पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलायला सुरुवात झाली आहे.

अधूनमधून उन्हाची उघडझाप झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलायला मदत होणार आहे. सद्यस्थितीत काहीच प्रकारची फुले पठारावर उमलली आहेत. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी फुले कास पठारावर पर्यटकांना वेळोवेळी पाहायला मिळणार आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पठारावर पर्यटकांनी फुले पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अधिकृत कासचा हंगाम सुरू नसल्याने कास पठार कार्यकारी समितीकडून अल्प दरामध्ये पर्यटकांना कासवरील फुले पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन दिवसांमध्ये 60 ते 70 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली.

Kas Pathar Satara News
दिल्लीत सातार्‍याचा गौरव; प्रजासत्ताकदिन परेडमधील चित्ररथावर कास पठार

दूरवस्था रस्त्याची ; फटका बामणोलीला

कासच्या हंगामाची चाहूल लागली आहे. कास परिसरामध्ये पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मात्र, कास पठार ते कास तलाव व कास तलाव ते कास गाव या दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खड्डयात गेला आहे. या दरम्यानच्या रस्त्यावरून प्रवास करताना पर्यटकांना व स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे इथून पुढे जाणारे पर्यटक हे या त्रासाला कंटाळून तिथूनच मागे येत आहेत. त्यामुळे बामणोली, शेंबडी, मुनावळे येथील पर्यटनाला फटका बसत आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती गरजेची आहे. अन्यथा हा रस्ता बंद करून कायमस्वरूपी घाटाईमार्गे वाहतूक सुरू करावी, अशी मागणी बोट चालक व स्थानिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news