

सातारा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील झेडपी शाळांची विद्यार्थी सुरक्षिततेसाठी दि. 18 डिसेंबरपर्यंत परीक्षा होणार आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थी किती सुरक्षित आहेत? त्यांना काय सुविधा दिल्या जात आहेत? या सर्व गोष्टींचा उलगडा या विशेष तपासणी मोहिमेत समोर येणार आहे.
बदलापूर येथील शाळेतील दुर्दैवी घटनेनंतर शिक्षण विभागाने शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले होते. यामध्ये शाळेतील इमारतीच्या दुरुस्तीपासून ते सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा आपत्कालीन योजना, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि इतर शारीरिक सुरक्षा बाबीचा समावेश आहे. शाळांनी त्याची माहिती शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली होती. शाळांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची 100 टक्के अंमलबजावणी झाली आहे की नाही? हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून तपासणी करणार आहे.
शाळा तपासणीचे आदेश खासगी शाळांसाठीही बंधनकारक आहेत. विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खासगी शाळांनी समान उपाययोजना राबवाव्यात यासाठी शिक्षण विभागाने नियम लागू केले आहेत. पालकांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालक हे शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जावून शाळेत असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेवू शकतात. यामुळे पालकांना शाळेतील सुरक्षितता आणि उपाययोजनांची पूर्ण माहिती मिळवता येईल. या पाहणीवेळी शाळेतील प्रवेशद्वारासमोर कॅमेरे, आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यवाही योजना, विद्यार्थ्यांसाठी नियमीत सुरक्षा शिबीरे आयोजित करणे, शाळेच्या इमारतीमध्ये देखभाल कार्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजनांची पाहणी हे पथक प्रामुख्याने करणार आहे.