

सातारा : सुमारे दीड कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी दोघा भावांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. देवस्थानची जमीन विश्वस्तांच्या खोट्या सह्या घेऊन ती विकून पैशांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना सप्टेंबर 2024 ते जून 2025 या कालावधीत घडली आहे.
रवींद्र पुरुषोत्तमदास शहा आणि मोहन पुरुषोत्तमदास शहा (दोन्ही रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी संशयितांची नावे असून, न्यायाधीशांनी संशयितांना 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली. याप्रकरणी धवलचंद्र बाळकृष्ण दोशी (वय 76, रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री काळाराम मंदिर व हटकेश्वर देवस्थान ट्रस्ट असून, या दोन्ही देवस्थानची सुमारे 40 एकर जमीन सातारा तालुक्यातील दरे खुर्द येथे आहे. या देवस्थानचे ट्रस्ट आहेत. मात्र, संशयित दोघांनी 23 सप्टेंबर 2024 च्या सभा नोटीसवर तसेच 30 सप्टेंबर 2024 च्या प्रोसिडिंगवर ट्रस्टमधील इतर विश्वस्तांच्या खोट्या सह्या केल्या.
त्या सह्यांच्या आधारे संशयित दोघांनी देवस्थान ट्रस्टची दरे खुर्द ता. सातारा येथील दीड कोटी किंमतीची चाळीस एकर जमीन विकली. विक्री करून आलेल्या रकमेचा अपहार संशयितांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार देवस्थान ट्रस्टीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे तक्रार अर्ज व कागदपत्रे दिल्यानंतर प्राथमिक दृष्ट्या अपहार वाटल्याने अखेर दोघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोनि सचिन म्हेत्रे करत आहेत.
देवस्थानची जमीन विकून घोटाळा केल्याप्रकरणी तक्रारदारांनी धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीबाबतही उल्लेख केला आहे. ट्रस्टींच्या बनावट सह्या केल्यानंतर ती कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून धर्मादाय कार्यालयाची संशयितांनी जमीन विक्रीसाठी परवानगी घेतली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.