

कोरेगाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील बाधित झालेल्या क्षेत्रापैकी मूल्यांकनास मान्यता दिलेल्या क्षेत्राची कार्यकारी अभियंत्यांमार्फत दस्त खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. थेट खरेदी प्रस्तावामधील उर्वरित जमिनीची मूल्यांकनाबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. उर्वरित जमिनीची दस्त खरेदीची कार्यवाही नियोजित असल्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे? असा सवाल आ. शशिकांत शिंदे यांनी केला होता.
सातारा जिल्ह्यातील सुपने गावातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना अद्याप त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या बाधित झालेल्या शेतकर्यांना भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे? असा सवाल आ. शिंदे यांनी केला.
त्यावर उत्तर देताना ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भूसंपादन संस्था म्हणून ओगलेवाडी विभागाच्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 25 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार खाजगी जमीन थेट खरेदी पध्दतीने घेण्यासाठीचे प्रस्ताव सातारा जिल्हाधिकार्यांना सादर केलेले आहेत. हे प्रस्ताव व जाहिरातीस मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन एकूण 2.44 हेक्टर एवढ्या क्षेत्राच्या मूल्यांकनास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांमार्फत दस्त खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. थेट खरेदी प्रस्तावामधील उर्वरित 1.82 हेक्टर जमिनीची मूल्यांकनाबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने या जमिनीची दस्त खरेदीबाबतची कार्यवाही करण्याचे देखील नियोजित असल्याचे सांगितले.